वाहतुकीचे नियम पाळताना प्रथम स्वत:ला अर्धे पोलीस समजा. त्यामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होईल आणि अपघात टळतील, असे प्रतिपादन हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते बोमन इराणी यांनी केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन इराणी यांच्याहस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महामार्ग वा कोणत्याही मार्गावर जखमी वा अत्यवस्थ व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला पहिल्यांदा वाट मोकळी करून द्या. त्यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतील, असेही ते म्हणाले. या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त प्रभात रंजन म्हणाले की, वाहतुकीचे नियम मोडणारी व्यक्ती वयाने मोठी असली तरी त्यांच्या चुकीची आठवण लहानग्यांनी करू देण्यास घाबरता कामा नये. अरुंद रस्ते आणि वाहतूक नियमांच्या अज्ञानामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे नियम पाळणे हाच त्यावरील उपाय आहे.