४४१ बेकायदा स्थळे कचाटय़ात

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील ४४१ बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार असून पोलीस बंदोबस्त मिळाल्यास पावसाळ्यातही ही कारवाई केली जाणार आहे. यात एमआयडीसी भागातील १०० तर सिडको हद्दीतील ३२५ बेकायदा धार्मिक स्थळांचा समावेश आहे. पालिका आणि वनविभागाच्या जमिनीवर अनुक्रमे आठ आणि सात बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. कारवाई करण्यासाठी न्यायालयाने १७ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत दिली आहे.

नवी मुंबईत बेकायदा इमारतींप्रमाणेच बेकायदशीर धार्मिक स्थळांचे प्रमाणही जास्त आहे. नवी मुंबईतील बहुतेक जमिनींची मालकी सिडकोकडे आहे. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६६७ बेकायदा धार्मिक स्थळे आढळली. यात दक्षिण नवी मुंबईतीलही धार्मिक स्थळांचा समावेश होता. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ही संख्या ४८३ आहे. त्यातील २२ बेकायदा धार्मिक स्थळे कायम करण्यात आली असून ३२५ स्थळांबाबत सिडकोत आजही संभ्रम आहे.

सिडको हद्दीतील काही संस्थांनी त्यांच्या धार्मिक स्थळांबाबत कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी सिडकोने एक महिन्याची मुदत घेतली आहे. बुधवारी नवी मुंबईतील धार्मिक स्थळांबाबत एक संयुक्त बैठक झाली. बैठकीला सिडको, एमआयडीसी, पालिका आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बेकायदा धार्मिक स्थळांचे स्थलांतर, नियमित करण्यात आलेली स्थळे आणि पाडकामाची कारवाई होणारी धार्मिक स्थळे अशा तीन प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे. सप्टेंबर २००९ नंतरच्या सर्व स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. एमआयडीसी क्षेत्रात १०० बेकायदा धार्मिक स्थळे असून त्यांच्यावरही पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

सिडकोकडून अंतिम सर्वेक्षण आल्यानंतर ही संयुक्त कारवाई येत्या पाच महिन्यांत केली जाणार आहे. पावसाळ्यात घरांवर कारवाई करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, मात्र धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी पावसाळ्याचा अडथळा नसल्याने या तीन महिन्यांतही बेकायदा धार्मिक स्थळांवर हातोडा पडणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. सिडकोच्या अंतिम सर्वेक्षणानंतर पोलीस बंदोबस्तात शहरातील ४४१ बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी पावसाळ्याचा कोणताही अडथळा नाही. अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका