वाशी सेक्टर १७ येथील प्लाझा इमारतीत पालिकेची कारवाई

वाशी सेक्टर १७ येथील प्लाझा या बहुमजली व्यावसायिक इमारतीतील अनधिकृत गाळ्यांवर पालिकेने कारवाई केली आहे. यावेळी गाळ्यामध्ये करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, पोटमाळे तसेच बेकायदेशीर शौचालयांवर हातोडा चालवण्यात आला.

वाशी सेक्टर १७ प्लाझा या इमारतीतील अनधिकृत बांधकामांना वाशी विभाग कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र या नोटिसीला प्रतिसाद न दिल्याने अखेर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने यावर कारवाई केली.

यावेळी इन हाऊस स्टुडिओ, विजय सेल्स, ड्रॅपर आदी दुकानांतील पोटमाळे, अनधिकृत शौचालये व किचन्स तोडण्यात आले.  व्यापारी संकुलामध्ये सद्य:स्थितीत वाहनतळाच्या जागेत वाहने उभी करू दिली जात नाहीत, असे निदर्शनास आले आहे.

यामुळे व्यापारी संकुलाच्या आसपास मोठय़ा प्रमाणावर पार्किंगची समस्या जाणवत आहे.

नागरिकांना रहदारीस त्रास होत असून वाहतूक कोंडी देखील होते. यामुळे पालिकेच्या वतीने या सर्व व्यापारी संकुलांना उपलब्ध पार्किंगच्या जागा सर्वासाठी खुल्या करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांचे पालन न करणाऱ्या व्यापारी संकुलांवर यापुढील काळात धडक कारवाई करण्यात येत आहे. पालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांना याआधीच नोटिसा बजावल्या आहेत.