शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या गाडय़ा व त्यांचे चालक अनेकदा संबंधित नियमांचा भंग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गाडय़ांची तपासणी सुरू केली आहे. याच मोहिमेंतर्गत अतिरिक्त विद्यार्थी वाहून नेणाऱ्या सलीम ट्रॅव्हल्सच्या बसवर मंगळवारी संध्याकाळी कळंबोलीमध्ये कारवाई करण्यात आली.
या बसमधून सुधागड एज्युकेशन विद्यालयातील विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. प्रादेशिक नियंत्रक उदय इंगळे यांनी मंगळवारी ही बस पकडली असता १५ आसनक्षमता असलेल्या या बसमध्ये २७ विद्यार्थी कोंबल्याचे आढळले. यावेळी या चालकाकडे कागदपत्रांची विचारणा केल्यावर पुरेशी कागदपत्रे त्याच्याजवळ नसल्याचे दिसून आले. या बसचा परवाना जानेवारीमध्ये संपूनही त्यातून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचे या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. याशिवाय या मुलींसाठी पर्यवेक्षक नसल्याचेही उघड झाले.
पनवेलमध्ये काही वर्षांपूर्वी एका खासगी गाडीला चालकाच्या हलगर्जीमुळे लागलेल्या आगीत अनेक लहानग्यांचा बळी गेला होता. या घटनेनंतरही विद्यालय व्यवस्थापने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे फारसे गांभीर्याने बघत नसल्याचे मंगळवारच्या प्रकारामुळे सिद्ध झाले आहे. पनवेल प्रादेशिक विभागाचे उपअधिकारी आनंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल आरटीओ अंतर्गत ८०२ विद्यार्थी वाहतूक बसना परवनागी देण्यात आली आहे. त्यापैकी बसचालक व मालकांनी विविध नियम तोडल्यामुळे गेल्या वर्षी ८१ बस मालकांकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पालकांनीही विचार करावा
कारवाई झालेली केवळ हीच बस नाही, तर असंख्य बसमधून विद्यार्थी कोंबून भरलेले दिसतात. जास्त मुले असतील तर बसमालकाला द्यावी लागणारी रक्कम कमी होते, असा विचार करून पालक असा धोका पत्करतात, त्यामुळे चार पैसे जास्त गेले तरी चालतील, मात्र आपल्या मुलांच्या जिवाशी खेळ होणार नाही, याची पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.