उच्च न्यायालयाने अनधिकृत फलकांविरोधात कारवाईचे सक्त आदेश दिले असतानाही नवी मुंबईतील बॅनरबाजी आजही कायम आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मोठय़ा नेत्यांपर्यंत सर्वजण फलकबाजीच्या माध्यमातून शहराला विद्रुप करीत आहेत. या फलकांच्या संख्येत वाढ होऊनही पालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्याकडे काणाडोळा केल्याचे दिसत आहे. शहरात होणाऱ्या फलबाजीला पालिका आयुक्तांना दोषी धरण्याचे न्यायालयाने म्हटले असूनही मुख्य रस्ते खोदून उभारण्यात आलेल्या जाहिरातीच्या कमानींवर कारवाई करण्यासाठी पालिका आधिकांऱ्याकडे वेळ नसल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सवात उभारण्यात येणाऱ्या मंडप, स्वागत कमानी, होर्डिग्ज, बॅनर आदींवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायलयाने देऊनही पालिकेने त्यास केराची टोपली दाखवली आहे. वाहतुकीला अडथळा ठरतील अशा कमानी उभारण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांच्या फलकांनी शहरातील महत्त्वाचे चौक आणि गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील परिसरात गर्दी केली आहे. यामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास होण्याबरोबरच शहराचे विद्रुपीकरणही होत आहे. वाशी सेक्टर १७, ऐरोली सेक्टर ९, कोपरखरणे तीन टाकी येथील परिसर, वाशी सेक्टर ९ , सानपाडा, नेरुळ, बेलापूर येथील अतंर्गत रस्त्यावर मोठय़ा स्वागत कमानी लावण्यात आल्या असून त्यावर देणगीदारांच्या जाहिराती झळकत आहेत. या फलकबाजीवर पालिकेकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  याप्रकरणी शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका विभाग आधिकांऱ्याना देण्यात आल्याचे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त दत्तात्रय नागरे यांनी सांगितले आहे.