कर्नाळा व रानसईमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा
प्राणी व पक्ष्यांसाठी कर्नाळा अभयारण्याचे क्षेत्र राखीव असून या अभयारण्यात तब्बल पंधरा वर्षांनंतर बिबटय़ाचे दर्शन झालेले आहे. त्यामुळे प्राण्यांचा अधिवास असलेल्या जागेत प्रथमच एक प्राणी आलेला असल्याने कर्नाळा व रानसई परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वन विभागाकडून केले जात आहे. त्याचप्रमाणे येथील नागरिकांसाठी सुरक्षेच्या उपाययोजनाही केल्या जात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. यासाठी परिसरात पोलीस गस्तही वाढविण्यात आली आहे. राज्यात दररोज नागरी वस्तीत कुठे ना कुठे तरी बिबटय़ा शिरल्याचे वृत्त झळकत असते. याला कोण जबाबदार आहेत. या प्राण्यांचे अधिवास असलेल्या ठिकाणांवरच मानवांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे मत फ्रेंडस ऑफ नेचर या निसर्गमित्र संघटनेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. तर गेली अनेक वर्षे जंगलात व अभयारण्यात वाघाचे अस्तित्वच नव्हते मग हा बिबटय़ा आला कुठून असा प्रश्न पडला आहे. या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा बिबटय़ा कांदळवनातील जंगलातून आला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उरण पनवेल परिसरातील कांदळवनात बिबटय़ाचे वास्तव्य असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रानसई व कर्नाळा परिसरात दिसलेला बिबटय़ा हा त्याच्यासाठी आरक्षित असलेल्या अधिवासात असल्याने त्याला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात असल्याची माहिती कर्नाळा विभागाचे वनपाल एस. के. पवार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठीही गाव व पाडय़ांवर कमिटय़ा तयार करून त्यांच्याशी वन विभाग संपर्क ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेनंतर या परिसरातील पोलीस गस्तही वाढविण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.