न्यु इंग्लिश स्कुलमधील साक्षी तिवारी या विद्यार्थिनीच्या पत्राची दखल 

शाळेला मैदानच नाही तर खेळायचे कुठे, असा सवाल करणारे पत्र कळंबोली सेक्टर दहामधील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी साक्षी तिवारी हिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिल्याने सिडकोने न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आजूबाजूला मोकळ्या मैदानाची उपलब्धता आहे का याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये मुलींनी इतिहास रचल्यानंतर प्रत्येक शाळेत असलेली खेळाविषयी उदासिनता साक्षीच्या पत्रामुळे प्रकट झालेली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आदर असलेल्या साक्षी तिवारी ह्य़ा नववीत शिकणाऱ्या मुलीने मागील महिन्यात मोदी यांना एक पत्र देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यास मैदानच नाही तर आम्ही खेळायचे कुठे असा सवाल करणारे पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून आले असून सिडकोला काय समस्या आहे त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी नुकतीच साक्षीची भेट घेऊन तिची तक्रार ऐकून घेतली. त्यानंतर सिडकोने या शाळेजवळील काही मोकळ्या मैदानांची चाचपणी केली असून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मैदान कसे उपलब्ध होईल याची चाचपणी केली जाणार आहे. नवी मुंबईत काही शालेय संस्थांना सिडकोने असे भूखंड शाळेला लागून दिले होते. हे भूखंड देताना सिडकोने शालेय वेळेनंतर आजूबाजूच्या नागरिकांना ही मैदाने खुली करण्याची अट घातली होती, मात्र काही शालेय संस्थांनी हे भूखंड आपली मालमत्ता आहे असे गृहीत धरून सुरक्षारक्षक नेमले होते. त्याविरोधात तक्रारी आल्यानंतर सिडकोने ही मैदाने खुली करण्याच्या सूचना या संस्थांना दिल्या आहेत. सिडकोकडे सध्या जमीन कमी असल्याने आणि या भूखंडांचा अशा प्रकारे गैरवापर केला जात असल्याने सिडकोने मैदानासाठी भूखंड देणे बंद केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काही शाळांना मोकळे भूखंड उललब्ध झालेले नाहीत.

सहा दिवसापूर्वी पंतप्रधान कार्यालयातून साक्षी तिवारीच्या पत्राची दखल घेतल्याचे पोचपत्र सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावे आले आहे. त्यानुसार तिच्या तक्रारीवर चाचपणी सुरू असून या शाळेच्या जवळपास एखादे मैदान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

किरण फणसे, अधीक्षक अभियंता, सिडको