प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

उरणमधील वाढत्या औद्योगिक तसेच जेएनपीटी बंदर परिसरात रासायनिक पदार्थाचा वापर वाढल्यामुळे या रसायनाच्या उग्र वासाचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे कॅन्सरसारखे असाध्य आजार जडण्याची भीती आहे. तर दुसरीकडे मातीचा भराव करणाऱ्या डम्परमुळेही रस्त्यालगत पडलेल्या धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरणमधील नागरिक त्रस्त असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई अथवा उपाययोजना होत नसल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे.

उरण तालुक्याची ओळख सध्या औद्योगिक परिसर म्हणून झाली आहे. येथे ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पात नाफ्त्यासारख्या अतिज्वलनशील व उग्र वासाच्या पदार्थाची साठवणूक केली जाते. अनेकदा या परिसरात एलपीजी या घरगुती वापराच्या वायूचा मोठय़ा प्रमाणात दर्प पसरतो. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असते. या संदर्भात वारंवार या परिसरातील ग्रामपंचायतीने तक्रारीही केल्या आहेत.

त्याचबरोबर जेएनपीटी बंदरातूनही विविध प्रकारच्या रसायनांचीदेखील आयात देखीव्ते. ही रसायने जेएनपीटी बंदराशेजारीच असलेल्या साठवणूक टाक्यात ठेवण्यात येतात. त्यामुळे या परिसरात रसायनांचा उग्र वास येतो.

जेएनपीटी बंदरातून हाताळण्यात येणाऱ्या रसायनांचा काय परिणाम होता. याची तपासणी जेएनपीटीकडून केली जात आहे. तर उर्वरित भागातील हवेतील प्रदूषणाच्या तपासणीसाठी लागणारे हवामान नियंत्रण यंत्र उपलब्ध नसून त्याची मागणी करण्यात आली आहे.

– सुनील पडवळ, नियंत्रक, नवी मुंबई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.