रुग्णवाहिकेतील प्रसूतीनंतरही वाशी ते भायखळा, पुन्हा भायखळा ते वाशी प्रवास

गोठिवली गावातील एका महिलेला ऐरोलीतील पालिका रुग्णालयात बुधवारी पहाटे तीन वाजता प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले; मात्र अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने तिला पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे निदान झाल्यामुळे वाशी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला थेट भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यानंतर तिला मुंबईला हलविण्यात आले. त्याच कालावधीत रुग्णवाहिका वाशी खाडीपुलावर पोहोचताच महिला प्रसूत झाली. अशा स्थितीत अत्यवस्थ असलेल्या महिलेला जे. जे. रुग्णालयात काही वेळाने दाखल करण्यात आले; परंतु या महिलेसाठी जे. जे. रुग्णालयातही जागा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी तिला पुन्हा ऐरोलीला पाठविले.

या संतापजनक प्रकारामुळे रुग्णालयातील बेपर्वा कारभार आणि असुविधा चव्हाटय़ावर आल्या आहेत. या महिलेला जुळे झाले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या महिलेवर वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णाच्या कुटुंबीयांची ऐरोली, वाशी ते मुंबई अशी फरफट करायला लावणाऱ्या डॉक्टरांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मीना मंगल साबळे (वय २४) ही नोसील नाक्याजवळील गोल्डन नगरात राहते. पहाटे तीनच्या सुमारास ऐरोली येथील राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र या रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा नसल्याने पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. वाशीतही पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने जे. जे. रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मीना अत्यवस्थ असताना तिच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याला पाझर फुटला नाही.

साबळे कुटुंबीयांनी आक्रोश केल्यानंतर रुग्णवाहिकेत एका अधिकाऱ्याला सोबत देऊन भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले; मात्र जे. जे. रुग्णालयातील झोपेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अत्यवस्थ मीना हिच्यावर उपचाराकरिता जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे थंडीत दोन नवजात अर्भकांसह रुग्णवाहिकेचा पुन्हा ऐरोलीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तशा परिस्थितीत तिची व तिच्या बाळांची प्रकृती चिंताजनक असताना हा प्रकार घडल्याने साबळे कुटुंबीयांच्या संतापाचा भडका उडाला.

सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असली तरी लहान मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जे. जे. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केलेल्या घटनेचे पुनरावृत्ती होऊ  नये म्हणून कठोर कारवाई करण्याची मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दोन नवजात अर्भकांना घेऊन थंडीत वाशी ते मुंबई आणि पुन्हा मुंबई ते वाशी असा प्रवास केल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ऐरोली येथील डॉक्टरांनी सांगितले.

प्रसूती झालेल्या महिलांची हेळसांड झाली आहे. ही बाब सत्य आहे. पण नवी मुंबई पालिका डॉक्टरांच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्यात आले होते. मात्र जे. जे. रुग्णालयाने या महिलेवर उपचार न करता त्यांला ऐरोली येथील रुग्णालयात पाठवून दिले. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून जे. जे. रुग्णालयाला याचा जाब विचारण्यात येईल.

– रमेश निकम, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई पालिका

माझी पहिली प्रसूती दोन वर्षांपूर्वी जळगाव येथे गावच्या घरी झाली होती. त्या वेळी बाळाला रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला. बुधवारची रात्रदेखील आमच्यासाठी भयावह ठरली. मला वेदना असह्य़ झाल्या होत्या आणि एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात असा प्रवास संपतच नव्हता. नवी मुंबईत उपचार झाले नाहीत असा प्रसंग कोणावरही येऊ नये.

– मीना सांबळे, पीडित महिला

  • पहाटे ३.३० ऐरोली येथील जिजाऊ रुग्णालयात दाखल
  • पहाटे ३.४५ : ऐरोलीतून वाशी रुग्णालयात रवाना
  • पहाटे ४.१५: वाशीत प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल
  • पहाटे ४.४५: वाशी येथून जे. जे. रुग्णालयाकडे रवाना
  • पहाटे ५.००: वाशी येथील पुलाजवळ रुग्णवाहिकेत पहिल्या मुलाचा जन्म
  • पहाटे ५.०५: दुसऱ्या मुलाला जन्म
  • सकाळी ६.४० : जे. जे. रुग्णालयात दाखल
  • सकाळी ७.०० : वाडिया रुग्णालयात दाखल
  • सकाळी ८.३०: ऐरोली येथील रुग्णालयात दाखल