हिवाळ्यात चांगल्या फळधारणेचा उत्पादकांना विश्वास

मोसमातील पहिला हापूस आंबा बुधवारी मुंबईच्या बाजारपेठे दाखल झाल्यानंतर यंदा हापूस आंब्याचे मोठे उत्पादन होण्याची आशा निर्माण झाली आहे. गतवर्षी कमी उत्पादनामुळे हापूस आंबा महाग झाला होता आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला होता.

हिवाळ्यात हापूस आंब्याला चांगली फळधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र येत्या चार महिन्यांत होणाऱ्या नैसर्गिक बदलांवर हे उत्पादन अवलंबून असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. वाशी फळ बाजारातील अनेक व्यापारी हे हापूस आंबा बागायतदारांना आगाऊ रक्कम देऊन बागा आरक्षित करतात. त्यामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनावर त्यांचे भवितव्य अवलंबून असते. हापूसमुळे चांगलीच कमाई होत असल्याने त्याच्या उत्पादनावर बागायतदारांप्रमाणे व्यापाऱ्यांचेही बारीक लक्ष असते.

कोकणातील हापूस आंब्याच्या व्यापारावर एपीएमसीतील घाऊक व्यापाऱ्यांनी फार मोठी गुंतवणूक केली आहे. इतर सर्व फळांच्या व्यापारापासून मिळणारे उत्पन्न आणि हापूस आंब्याच्या व्यापारातून मिळणारा नफा सारखाच असल्याचे सांगितले जाते. गतवर्षी हापूस आंब्याचे एक लाख २६ हजार पेटय़ा आल्याची नोंद आहे. कमी उत्पादनामुळे हापूस आंब्याचे दर शेवटपर्यंत कमी झाले नव्हते. फळांचा आकार कमी असल्याने त्याला म्हणावा तसा उठावही नव्हता. यंदा राज्यात पाऊस चांगला पडला असून तो कोकणातील हापूस आंब्याला पूरक आहे. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यात मोहर आणि त्यानंतर हापूस आंब्याला फळधारणा होते मात्र याच काळात थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास ही फळधारणा गळून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुधवारी बाजारात आलेला हापूस आंब्याची फळधारणा ही ऑगस्ट महिन्यात झाल्याने त्यांची जपणूक बागायतदारांने केल्याने हा आंबा ते बाजारात पाठवू शकले असल्याचे मत फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. हापूस आंब्याचा सर्वसाधारण हंगाम सुरू होण्यास मार्च महिना उजाडणार आहे. यंदा हापूस आंब्याचे विक्रमी उत्पादन होण्याची आशा बागायतदारांबरोबर व्यापाऱ्यांना आहे मात्र पुढील चार महिने होणाऱ्या नैर्सगिक बदलांवर हे उत्पादन अवंलूबन आहे.

पावसाळ्यानंतर आलेला मोहर आणि झालेल्या फळधारणेमुळे यंदा हापूस आंब्याचे विक्रमी उत्पादन होण्याची आशा आहे मात्र येत्या काळात पडणाऱ्या थंडीवर हे चक्र अवलंबून आहे. नोटांबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. त्यात हापूस आंब्याचे उत्पादनावर फळ व्यापाऱ्यांची मदार आहे.

– संजय पानसरे, व्यापारी, फळ बाजार, एपीएमसी