केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे गौरवोद्गार

अवघ्या २७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने ज्याप्रमाणे कोकणाला देशांशी जोडले आहे, त्याचप्रमाणे देशातील विविध प्रांतालादेखील जोडले आहे. रेल्वेचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प चिनाब नदी येथे साकारत आहे. कोकण रेल्वेने देशांच्या विकासात अल्प काळातच दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अंनत गीते यांनी काढले. कोकण रेल्वेने २७ वष्रे पूर्ण केल्याने कोकण रेल्वेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कर्मचांऱ्याच्या सत्कार सोहळयांचे आयोजन वाशी येथे सिडकोच्या एक्झिबेशन सेंटरमध्ये करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला कोकण रेल्वे प्रकल्पाचे मुख्य प्रबंधक संजय गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोकण रेल्वेच्या २७ वर्षांच्या कार्यपूर्तीबद्दल कोकणच्या लोकल सेवेमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या सफाई कामगारापासून वरिष्ठ अधिकांऱ्याचा गीते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पंकज परवाज यांनी तयार केलेल्या कोकण रेल्वेच्या चित्रफितीचे प्रकाशनदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉर्पोरेशनचे मुख्य प्रबंधक गुप्ता यांनी मागच्या २७ वर्षांमध्ये कोकण रेल्वेने अधिकाधिक सुविधा देण्याबरोबर २ हजार कोटीहून अधिक उलाढाल केल्याची माहिती दिली. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी, आपण स्वत: कोकणातील असून कोकणातील प्रवाशांसाठी आपल्याला नेहमीच आत्मीयता असल्याचे सांगितले.