गोठवली गाव येथील राजीव गांधी खदाण तलावामध्ये मत्स्य उत्पादन करण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. प्रथम एका वर्षांकरिता व त्यापुढील कामाची गुणवत्ता लक्षात घेता पुढील पाच वर्षांकरिता दरवर्षी १० टक्के भाडेवाढ देण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली.
या तलावाचा ५ वर्षांसाठीचा मत्स्य उत्पदनांचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी आला असता हा प्रस्ताव नवी मुंबईतील सर्वच तलावासाठी आला पाहिजे, अशी सूचना नगरसेविका वैजयंती भगत यांनी प्रशासनाला केली. तर नगरसेवक किशोर पाटकर यांनी शहरातील तलाव स्वच्छ रहावेत यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तलावामधील पाणी न काढता फक्त गाळ काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्र घेता येईल का यांचा विचार प्रशासनाने करावा, अशी सूचना नगरसेवक अनंत सुतार यांनी केली. नवी मुंबईतील खाडी परिसरामध्ये असणाऱ्या पट्टय़ात गणेश व देवी विसर्जनांची सोय करण्यात येईल, असे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले. नवी मुंबईत पालिकेच्या नियंत्रणात किती तलाव आहेत याची माहिती सादर करण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.