केंद्र सरकारच्या नीलक्रांतीयोजनेअंतर्गत तारापोरवाला मत्स्यालय व्यवस्थापनाचा उपक्रम

चर्नी रोड येथील तारापोरवाला मत्स्यालय व्यवस्थापनाने शाळा, महाविद्यालये, तसेच सहकारी कार्यालयांमध्ये माशांच्या टाक्या पुरविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘नीलक्रांती’ योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार असून, शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी आस्थापनांमध्ये मत्स्य संगोपनाची आवड निर्माण व्हावा, असा यामागील मत्स्यालय व्यवस्थापनाचा हेतू आहे.

२०१५ साली मत्स्यालयाच्या नूतनीकरणानंतर येथील सागरी जैववैविध्य पाहण्यासाठी पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मत्स्यालय आवारात माशांचे प्रजनन केंद्र येत्या काळात उभारले जात असतानाच जोडीने अनेक उपक्रम मत्स्यालय व्यवस्थापनाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यात शाळा, महाविद्यालये आणि सहकारी कार्यालयांना मत्स्य संगोपनाच्या टाक्या उपलब्ध करून देणारा उपक्रम व्यवस्थापनाकडून राबवला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे वरील संस्थांमध्ये मत्स्य संगोपनाच्या काचेच्या टाक्या (फिश टँक) बसवण्याचा निर्णय मत्स्य विभागाने घेतला असून मत्स्यालय व्यवस्थापनाकडून उपक्रम यावर देखरेख ठेवणार आहे. केंद्र सरकारच्या ‘फ्रेश वॉटर इंटिग्रेटड ऑनामेंटल युनिट’ या योजनेंतर्गत हा उपक्रम अमलात आणला जाणार आहे.

माशांच्या टाक्यांचा खर्चाबरोबरीनेच त्यांचा वर्षांभराचा देखभालीचा खर्चही व्यवस्थापनाकडून देण्यात येणार आहे. चार फूट काचेच्या टाकीसाठी बारा हजार रुपये तर दहा फूट टाकीसाठी पंचावन्न हजार रुपये एवढी रक्कम संस्थानाला मत्स्यालयाकडून देण्यात येईल. शिवाय वर्षांला सहा हजार रुपये देखभालीचा खर्चही व्यवस्थापन देणार असल्याची माहिती मत्स्यालयाचे अधिरक्षक अंजिक्य पाटील यांनी दिली. यासाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये मत्स्य संगोपनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहआयुक्त विनोद नाईक यांनी दिली.