आर्मी को. ऑ. हाऊसिंग सोसायटी, नेरुळ सेक्टर-९

‘शून्य कचरा’ हा एखाद्या सहकारी गृहनिर्माण संकुलाचा उद्देश असेल तर त्यातून किती तरी समाजोपयोगी कामे पार पाडता येतात, हे नेरुळमधील आर्मी सहकारी गृहसंस्था दाखवत असून ती सध्या कचऱ्याविरोधातील लढाई मोठय़ा हिकमतीने लढत आहे.

आर्मी, अर्थातच लष्करातील आजी आणि माजी जवानांसाठी हे गृहसंकुल उभारण्यात आले आहे. संकुलात शिस्त ही प्रथम येते. प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणी हवी, त्याच ठिकाणी ती ठेवली जाते. ती प्रत्येकासाठी सक्तीची आहे. यात कोणताही बेजबाबदारपणा सहन केला जात नाही; परंतु या संकुलात हिरवाईसुद्धा नांदत आहे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. यासाठी संकुलातील कचरा नावाचा शत्रू येथील आजी-माजी जवानांनी नष्ट केला आहे. म्हणजे अगदी काटेकोरपणे कचऱ्यावर हल्ला केला जातो. म्हणजेच त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. प्रत्येक समस्येशी लढणे हेच सैनिकाचे ध्येय असते. ही लढाई निव्वळ सीमेवरच नाही. ती आजूबाजूला नेहमीच लढावी लागते. तर अशा रौद्ररूप धारण करू पाहणाऱ्या कचऱ्याचे नामोनिशाण मिटविण्यासाठी ‘आर्मी’च्या रहिवाशांनी सेंद्रिय खतनिर्मिती सुरू केली आहे. यासाठी त्यांना पालिकेची मदत मिळाली आहे.

नेरुळ सेक्टर-९ मध्ये गजबजलेल्या परिसरात ‘आर्मी’ १९९५ साली उभारण्यात आली. ‘आर्मी वेल्फेअर सोसायटी’ हे या गृहसंकुलाचे पहिले नाव. २०११ साली त्याचे नामकरण गृहसंस्था असे करण्यात आले. ११ इमारती आणि ३८ बैठी घरे मिळून ५१८ सदनिका या संकुलात आहेत. संकुलाचा आकार मोठा असल्याने रहिवाशांची वर्दळही तितकीच आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही तितकेच आहे. ते नियंत्रणात आणण्यासाठी सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात आला. संकुलात दोन वर्षांपासून जैविक खतनिर्मिती प्रणालीचा वापर केला जात आहे. यासाठी संकुलात १४ खड्डे तयार करण्यात आले आहेत. यात ओला कचरा, झाडांचा पालापाचोळा टाकला जातो. यातून दिवसाकाठी आठ किलो कचरा जमा होतो. यात प्रक्रिया होऊन महिन्याकाठी १०० किलो खतनिर्मिती होते. तयार झालेले खत संकुलातील वृक्षांसाठी वापरले जाते.  तसेच उर्वरित खत हे पालिकेला उद्यानासाठी पुरवले जाते. तंत्रज्ञान वापरून अधिक जलदगतीने खत तयार करण्यासाठी पालिकेकडून कंपोस्ट खत तयार करणारी यंत्रे या संकुलास पुरविण्यात आली आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर या यंत्रांचा उपयोग सुरू आहे. एकाच वेळेस २५ किलो खतनिर्मितीची या यंत्रांची क्षमता असल्याचे ‘आर्मी’तील रहिवाशांनी सांगितले. शून्यकचरा उद्दिष्टामुळे संकुलातील वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. वनीकरणाच्या पातळीवरही ‘आर्मी’ मागे नाही. संकुलाच्या दुतर्फा आणि चौकाचौकांत वृक्षांची दाट सावली अनेकांना आकर्षित करते. येथील उद्यानात विविध वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. काही ठिकाणी उंचच उंच वृक्ष आहेत. संकुलातील या कामगिरीमुळे नवी मुंबई महापालिकेकडून दोनदा वनराई पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

याशिवाय तरुणांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तरुणांना संरक्षणाचे धडे दिले जातात. विशेष म्हणजे संकुलातील रस्त्यांवर गतिरोधक आहेतच, याशिवाय पार्किंगच्या जागेतून वाहने बाहेर काढताना अपघात टाळण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी मोठय़ा आकाराचे आरसे बसविण्यात आले आहेत.