काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा सवाल

काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरात करून राज्य व केंद्रात सत्ता मिळविणाऱ्यांनी दोन वर्षे हातात सत्ता आल्यावर एकही निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे घेऊ शकले नाहीत, उलट सरकार चालविताना घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात विविध स्तरांवर खदखद व्यक्त केली जात आहे, विविध जातींचे मोर्चे काढण्याचे वेळ समाजांवर आली, चुकीची अर्थनीतीमुळे व्यापारी थंडावले, असा घणाघात करीत हे कुठे गेले सर्वसामान्यांचे सरकार, असा प्रश्न काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

पनवेल येथील फडके नाटय़गृहामध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते.

पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची मोठ बांधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन काँग्रेसने केले होते. या वेळी तळोजा गावचे माजी सरपंच ताहिर पटेल, सुभाष गायकवाड, त्रिंबक केणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी विविध राजकीय पक्षातून काँग्रेसमध्ये चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करून पनवेल विधानसभा काबीज केल्यामुळे काँग्रेसला खिंडार पडले होते. गुरुवारच्या मेळाव्यात फडके नाटय़गृह कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने नाटय़गृहातील तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आयोजकांनी स्क्रीन लावली होती.