घणसोली प्रभाग कार्यालयातही मोडतोड

बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास आलेल्या पथकांबरोबर पोलीस बंदोबस्त असल्याने हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता स्थानिक नगरसेवकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वी गोठवली गावातील नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांच्या गाडीवर त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या प्रकल्पग्रस्त महिलेने कोयत्याने हल्ला केला. गावातील रस्ता रुंदीकरणात या प्रकल्पग्रस्तांची चायनीज दुकाने जमीनदोस्त करण्यात आली होती. त्याचा राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आला होता. नवी मुंबईतील सर्व प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली डिसेंबर २०१५ पर्यंतची घरे कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सिडको किंवा पालिका २०१५ पूर्वीच्या घरांवर कारवाई करत नाही, पण प्रकल्पग्रस्तांची गरज अद्याप संपलेली नाही.

काही प्रकल्पग्रस्त आजही बिनधास्त बेकायदा बांधकामे करीत आहेत. त्यावर पालिका व सिडको पोलीस बंदोबस्तात कारवाई करत आहे. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांचा विरोध मोडून काढला जात असून अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकामांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना देत असल्याच्या गैरसमजातून हल्ला व शिवीगाळ केली जात आहे.

गोठवली गावातील अशा नेमक्या बांधकामांवर कारवाई होत असल्याने यामागे काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांचे पती माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा हात असल्याचा आरोप कारवाई करण्यात आलेल्या महिला प्रकल्पग्रस्ताने केला आहे. त्यामुळे शुक्रवारी म्हात्रे यांच्या शेजारी जयमाला पाटील यांनी थेट कोयता घेऊन म्हात्रे यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यात म्हात्रे दांपत्य नव्हते. या प्रकल्पग्रस्त महिलेचा राग इतका अनावर झाला होता की तसाच कोयता घेऊन ती घणसोली येथील प्रभाग कार्यालयात धडकली. त्या ठिकाणी प्रभाग अधिकारी नसल्याने या महिलेने आजूबाजूच्या साहित्याची मोडतोड केली.

या महिलेच्या तडाख्यात प्रभाग अधिकारी सापडले असते तर त्यांच्यावर थेट हल्ला केला गेला असता, अशी चर्चा आहे. आजूबाजूला इतर बेकायदा बांधकामे सुरू असताना आमच्याच चायनीज दुकानावर कारवाई का, असा या महिलेचा सवाल आहे, तर गावातील रस्ता रुंदीकरणात अनेक बांधकामे तोडली गेल्याचे म्हात्रे कुटुंबीयाचे मत आहे. अशाच प्रकारे पूर्ववैमनस्यातून घणसोलीचे माजी दिवंगत नगरसेवक संजय पाटील यांच्यावरही काही वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता.