जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आणि २०० पेक्षा जास्त देशांत खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने नवी मुंबईत झाले, मात्र जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या खेळाच्या नवी मुंबईत होणाऱ्या समान्यांना मात्र अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आयोजकांच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय ठरला. या स्पर्धेसाठी योग्य प्रेक्षक नियोजन करता येण्यासारखे होते. शहरात पार पडलेल्या सामन्यांत नवी मुंबईतील फुटबॉलप्रेमींची उपस्थिती नगण्य होती. असे का घडले, याचा शहर पातळीवर विचार होणे आवश्यक आहे.

कोणत्याही खेळासाठी प्रेक्षक बळजबरीने आणता येत नाहीत. पण ज्यांना स्वारस्य आहे, त्यांना संधी उपलब्ध करून देणे हे आयोजकांचे काम आहे. देशात क्रिकेटप्रेमी मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या सामन्यांवर प्रेक्षकांच्या अक्षरश: उडय़ा पडतात. मात्र फुटबॉल सामन्यांचे तसे नाही. मुळातच फुलबॉलप्रेमी मोजके, त्यात त्यांना स्टेडियमपर्यंत आणण्यात आयोजकांनाही अपयश आले.

नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये हे सामने खेळले जात आहेत. १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक सामन्यांतील एकूण सामन्यांपैकी आठ सामने नवी मुंबईत होणार होते. त्यातील १८ व २६ ऑक्टोबरचे दोन सामने शिल्लक आहेत. पहिल्या दिवशी या सामन्यांसाठी ५२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये केवळ २२ हजार प्रेक्षक होते. ही संख्या नंतरच्या सामन्यात दहा ते बारा हजारांपर्यंत घसरली. १८ ऑक्टोबरला तर दिवाळी आहे. त्यामुळे त्या दिवशी ही प्रेक्षक संख्या अधिक रोडवाण्याची चिन्हे आहेत. २६ ऑक्टोबरला या स्पर्धेची उपांत्य फेरी नेरुळमध्ये होणार आहे. त्या दिवशी प्रेक्षक संख्येचा आलेख उंचावण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र यात नवी मुंबई वगळता देशाच्या अन्य भागांतून आलेल्यांची संख्या जास्त असणार आहे. नवी मुंबईकर या सामन्यांसाठी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते.

याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेनेही गेले सहा महिने फिफा एके फिफाचा उद्घोष केला. विविध सोयी-सुविधा आणि शहर सुशोभीकरणासाठी २०-२५ कोटी रुपये खर्च केले. केंद्र आणि राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर हा खर्च करणे पालिकेला अनिवार्य होते, पण हा खर्च नवी मुंबईकरांनी भरलेल्या विविध करांतून करण्यात आला. या एका स्पर्धेमुळे शहरातील इतर विकासकामांकडे दुर्लक्ष झाले, हे मान्य करावे लागेल. यात समाधानाची बाब एकच आहे, नेरुळकडे जाणाऱ्या शीव-पनवेल महामार्गापासून काही अंर्तगत रस्ते देखील या निमित्ताने चकाचक झाले.  शीव-पनवेल मार्गावरील सुशोभीकरणाची इतर कामे तर स्पर्धा संपल्यानंतर होणार असे दिसून येत आहे.

या स्पर्धेची सर्व तिकिटे ही ‘फिफा’कडून वितरित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यात पालिका किंवा डी. वाय. पाटील अकॅडमीचा काहीही संबध नाही. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे खूप दूर वाटणाऱ्या नवी मुंबईकडे फुटबॉल प्रेमींनी पाठ फिरवल्याचे लक्षात आल्यानंतर पालिकेने काही तिकिटे फिफाकडे मागून घेतली. यातील बहुतेक तिकिटे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. पालिका प्रशासनावर त्यावरून टीकाही झाली, मात्र हीच पद्धत आधी अवलंबली असती, तर स्टेडियममधील प्रेक्षक संख्या वाढली असती आणि विद्यार्थ्यांच्यात फुटबॉलप्रेम निर्माण झाले असते.

दिल्लीपेक्षा आपल्याकडे गर्दी जास्त आहे, असे सांगून पालिका अधिकाऱ्यांनी स्वतची पाठ थोपटून घेतली, पण या स्पर्धेसाठी प्रेक्षकांचे योग्य नियोजन झाले असते तर डी. वाय. पाटील स्टेडियम किमान अर्धे तरी भरले असते. नवी मुंबईकडे एज्युकेशनल हब म्हणून पाहिले जाते. अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि व्यवस्थापन संस्था नवी मुंबईत आहेत. या संस्थांशी फिफाच्या संमतीने संपर्क करून त्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेकडे आकर्षित केले गेले असते तर नवी मुंबईतही या खेळाची बीजे रोवली गेली असती, मात्र सरकारी बाबूंनी

केलेल्या परिश्रमात प्रेक्षक हा घटक शेवटच्या रांगेत ठेवण्यात आला. त्यामुळे त्यानेही या स्पर्धेकडे पाठ फिरवली. शहरातील अनेक संस्था, महाविद्यालये, नागरिक यांना या जागतिक दर्जाच्या स्पर्धेबद्दल माहिती नाही.

या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईचे नाव जगाच्या पटलावर उमटण्याची आशा मावळली आहे. या काळात अडीच ते तीन हजार पोलीस बंदोबस्तावर आहेत. त्यांची दिवाळी या स्पर्धेमुळे बंदोबस्तात जाणार आहे. खारघरमध्ये सध्या अनेक बुवा, बाबा, दीदी यांची संमेलने होतात. त्यांच्याही चार-पाच दिवसाच्या संत्सगाला पाच ते दहा लाख भक्तगण गोळा होतात. त्याच्या १० टक्के देखील प्रेक्षक या सामन्यांना आले नाहीत. यासाठी फुटबॉलविषयीच्या अनास्थेबरोबरच ढिसाळ नियोजनही कारणीभूत आहे.

कोटय़वधी रुपये खर्च

या सामन्यांसाठी नेरुळमधील डी. वाय. पाटील अकॅडमीने खूप मेहनत घेतली. क्रिकेटचे एक-दोन सामने वगळता डी. वाय. पाटीलच्या वाटय़ाला सामने येत नाहीत. त्यामुळे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आलेल्या या स्टेडियमच्या वीजदेयकाचा खर्च देखील सध्या निघत नाही. हा पांढरा हत्ती ज्याच्या बळावर बांधण्यात आला त्या मेडिकल, इंजिनीअरिंगलाही  दिवस वाईट आल्याने त्यातील उत्पन्न या स्टेडियमच्या देखभालीवर खर्च करण्यासारखा काळ राहिलेला नाही. त्यामुळे क्रिकेटची नाही तर किमान फुटबॉलची तरी कृपा या स्टेडियमवर व्हावी यासाठी डी. वाय. पाटील स्टेडियमचे रुपडे बदलून ते फुटबॉलसाठी सज्ज करण्यात आले. यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोटय़वधी रुपये खर्च केले गेले. जाहिरातीतून या खेळावर होणारा खर्च वसूल केला जाणार होता, पण आता हातात धुपाटणे येण्याची वेळ आली आहे.