प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभागाकडून संयुक्त कारवाई

पनवेलमधील रिक्षाचालकांच्या मनामानी कारभाराविरोधात पनवेल वाहतूक विभागाकडून कारवाईचे करण्यात येणार आहे. पनवेलमधील बोगस रिक्षा तसेच मनमानी भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर एप्रिलपासून कारवाई करण्याचे संकेत प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिले आहेत.

पनवेलसह नवीन पनवेल खारघर, कळंबोली, कामोठे या विभागातही रिक्षाचालकांकडून अवाच्या सवा भाडे आकारले जाते. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांनुसार नवी मुंबईत ‘सीएनजी’ इंधन वापरणाऱ्या रिक्षाचालकांनी मीटरसाठी दीड किलोमीटर अंतराला १९ रुपये तर शेअिरगकरिता आठ रुपये भाडे आकारावे असा नियम आहे. मात्र, रिक्षाचालक पनवेलमध्ये ३० रुपयांपासून ते पुढे कितीही भाडे आकारतात. तर नवीन प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे आकारून वेठीस धरले जाते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणाऱ्या मोहिमेची माहिती देण्यास टाळाटाळ केली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी, ‘या संयुक्त कारवाईच्या माध्यमातून मीटरनुसार भाडे आकारण्याची सवय रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या अंगवळणी पडेल ’ असे सांगितले.

चालकांवर वचक नाही

अवाच्या सवा भाडे आकारणाऱ्या तसेच बोगस रिक्षाचालकांना ताळ्यावर आणण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांना आता वाहतूक शाखेची मदत घेण्याची वेळ ओढवली आहे. तसेच वेळोवेळी रिक्षाचालकांचा दमदाटीपणा, मुजोरपणा निदर्शनास आणूनदेखील कारवाई होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

अद्याप आमच्याकडे प्रवाशांकडून तक्रारी आलेल्या नाहीत. तक्रारी आल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल. आरटीओ आणि वाहतूक शाखाच्या मदतीने एप्रिल महिन्यात बोगस रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

लक्ष्मण दराडेप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, पनवेल