शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतिदिनी डीवायएफआय या युवक संघटनेने तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. तसेच केंद्र व राज्य सरकारने आपल्या विभागातील रिक्त जागा त्वरित भराव्यात या प्रमुख मागणीसाठी बुधवारी उरणच्या तहसील कार्यालयावर रॅली काढली होती, तर सीआयटीयू या कामगार संघटनेने कामगारांवरील अन्यायाविरोधात जनजागरण रॅली काढून कामगारांच्या द्वारसभा घेतल्या. या वेळी उरण तहसील कार्यालयावर केंद्र व राज्य सरकारच्या युवक व कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. तसेच कामगारांनी औद्योगिक विभागात अभिवादन केले.
बेरोजगारांना काम द्या, या मागणीसाठी डीवायएफआयने राज्यभरात शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या हौतात्म्यदिनी सरकारविरोधात आंदोलन जाहीर केले होते.
याचाच एक भाग म्हणून उरणमध्ये या युवक संघटनेने उरण एसटी स्टँड चारफाटा येथून उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी बेरोजगारांना काम द्या, केंद्र व राज्य सरकारने आपल्या विभागातील पंधरा लाखांपेक्षा अधिक रिक्त जागा त्वरित भराव्यात. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अमर रहे आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
रॅली उरणच्या तहसील कार्यालयावर पोहोचली. त्यानंतर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकास अभिवादन करून सभा घेण्यात आली. या सभेत कामगार नेते भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे, डीवायएफआयचे जिल्हा सचिव संतोष ठाकूर, अध्यक्ष रवींद्र कासुकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या तरुण व बेरोजगारीविरोधी धोरणांचा समाचार घेत सरकारने जाहीर केल्यानुसार वर्षांला दोन कोटी रोजगार द्यावेत.
तसेच उरण वाढत्या औद्योगिकीकरणात येथील स्थानिक भूमिपुत्रांनाच प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण देण्याचीही मागणी केली.
त्यानंतर भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या हुतात्म्यांच्या तसबिरी लागून एका सजवलेल्या ट्रकमध्ये उरणमधील औद्योगिक विभागात रॅली काढून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.