बी-२ टाईप ओनर्स असोसिएशन, वाशी

करिअरचे नवनवे पर्याय खुले होत असताना नेमके कोणत्या वाटेने जावे याविषयी अनेक विद्यार्थी गोंधळलेले असतात. त्यांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी मग करिअर मार्गदर्शकांचा सल्ला घेणे, परिचितांशी चर्चा करणे अशी धडपड सुरू होते, मात्र वाशी येथील बी-२ टाइप ओनर्स असोसिएशन या संकुलाने हा जटिल प्रश्न अगदीच सोपा केला आहे. इथे राहणाऱ्या मुलांना संकुलातच करिअर मार्गदर्शन मिळत आहे.

दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळे आयोजित करून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या निवासी वसाहती अनेक आहेत, मात्र अशा सोहळ्यांतून केवळ प्रोत्साहन मिळते, दिशा नाही. म्हणूनच वाशी येथील बी/२ टाइप ओनर्स असोसिएशन संकुलाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कौतुक सोहळ्यांचा सरधोपट मार्ग न स्वीकारता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळवून देण्याचा थोडा कठीण मात्र दिशादर्शक उपक्रम या संकुलात राबवण्यात येत आहे.

वाशी सेक्टर १६ येथे १९८३ साली हे संकुल स्थापन झाले आहे. संकुलात एकूण १७५ सदनिका आहेत. सोसायटी वाशीतील गजबजलेल्या परिसरात वसलेली आहे. बाजार, उद्याने, मंदिर, शाळा, महाविद्यालय सारे काही अगदी जवळ आहे. परिसर गजबजलेला असला, तरीही त्याचा त्रास येथील रहिवाशांना होत नाही. संकुलाच्या अंतर्गत भागात कायम शांतता असते. संकुलाचे भविष्य हे तेथील मुलांच्या जडणघडणीवर अवलंबून आहे, या विचारातून या संकुलातील काही सदस्यांनी एकत्र येऊन येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. येथील मुलांना लहान वयातच स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे पटवून दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन त्याच्या आवडीच्या विषयाशी निगडित अधिकाधिक ज्ञान आणि संधी त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांचे शालेय, महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठीही मार्गदर्शन केले जाते. उच्च शिक्षण घेताना विशेषत शिक्षणासाठी परदेशात जाताना येणाऱ्या आर्थिक आणि इतर अडचणींवर मात कशी करावी, हे देखील येथे सांगितले जाते. एखाद्या गुणवान विद्यार्थ्यांच्या शिक्षणात केवळ आर्थिक अडचणींमुळे अडथळा येत असेल, तर शैक्षणिक कर्ज कसे मिळवावे, त्यासाठी कोणत्या औपचारिकता पार पाडाव्या लागतील, याची संपूर्ण माहितीही दिली जाते. या संकुलातील अनेक मुले उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली असल्याचे येथील रहिवासी सांगतात. लहानपणापासूनच मुलांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवण्यात आल्यामुळे त्यांच्या करिअरविषयी पालकही निश्चिंत असतात.

गेल्या वर्षांपासून संकुलाच्या सर्वागीण विकासासाठीही पावले उचलण्यास सदस्यांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा कणा समजल्या जाणाऱ्या कचरा वर्गीकरण प्रक्रियेत या संकुलाने भाग घेतला आहे. ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी दोन कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. संकुलात वृक्षारोपणासाठी जागा नसली, तरीही त्यावाचून रहिवाशांचे काही अडलेले नाही. त्यांनी मातीच्या कुंडय़ांमध्ये विविध प्रकारची झाडे लावून आणि त्यांचे नीट संगोपन करून या समस्येवरही मात केली आहे.

संकुलात पार्किंगचा प्रश्न आहे, परंतु तरीही सोसायटीतील रहिवासी रस्त्यावर वाहने उभी करणार नाहीत, अधिकृत पार्किंमध्येच वाहने ठेवतील, याची खबरदारी घेतली जाते. येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय आणि विरंगुळा केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वच्छतेवर अधिक भर

संकुलातील सदस्य स्वच्छताप्रेमी आहेत. केवळ ओला-सुका कचरा वेगळा करण्यावर ते थांबलेले नाहीत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ते संकुलाच्या अंतर्गत भागातील नाले, सांडपाणी वाहिन्या यांची साफसफाई करून घेतात. पावसाचे पाणी साचू नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डासांची पैदास वाढल्यामुळे होणारे आजार या संकुलापासून दूर राहिले आहेत. पावसाळ्यात अंतर्गत भागातील शेवाळे ब्लिचिंग पावडर टाकून काढण्यात येते. रहिवासी घसरून पडू नयेत, म्हणून ही काळजी घेतली जाते. संकुलातील पावसाळी नाले आणि सांडपाणी व्यवस्थेची पुनर्बाधणी करावी, अशी मागणी पालिकेकडे करण्यात आल्याचे येथील रहिवासी सांगतात.