नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या पुलाच्या महत्त्वाच्या कामानिमित्त सीबीडी-बेलापूर येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सीबीडी उड्डाणपुलाखालील सर्कलपासून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या जड व अवजड वाहने तसेच प्रवासी वाहनांना २१ डिसेंबरपासून मेट्रो पुलाचे काम संपेपर्यंत म्हणजे तब्बल दोन महिने प्रवेश बंद राहणार आहे. या वेळी मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

सायन-पनवेल महामार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. २१ डिसेंबरपासून मेट्रो पुलाचे काम जवळपास ७० दिवस चालणार आहे. त्यामुळे सीबीडी परिसरातून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या वेळी पर्यायी मार्ग म्हणून सायन-पनवेल मार्गावर पुणे वाहिनीवर तीन लेन पुलावरून येणारी वाहतूक सीबीडी उड्डाणपुलाचे पुढील बाजूस दोन लेनमध्ये चालू ठेवण्यात येणार आहे. पुलाचे वरून येणारे वाहतुकीचे एक लेन बंद करून पुलाच्या खालून येणारी वाहने सदर लेनवरून मार्गस्थ करण्यात येतील. सीबीडी उड्डाणपुलाचे खालून सीबीडी सर्कलपासून पुणे बाजूस पुढे जाणारी अवजड वाहने प्रवासी वाहनांना सीबीडी सर्कलपासून पुणे बाजूस जाण्याकरिता बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग अवजड वाहने सीबीडी उड्डाणपुलावरून पुणे बाजूकडे जाता येणार आहे. याला अपवाद फक्त हलक्या वाहनांना सीबीडी उड्डाणपुलाचे खालील रस्त्यांवरून प्रवेश देण्यात आलेला आहे. भाऊराव पाटील चौकातून सीबीडी सर्कलवरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या जड अवजड वाहने, प्रवासी वाहनांना सीबीडी सर्कलपासून पुणे बाजूकडे हलकी वाहने प्रवेश बंदी घोषित करण्यात आलेली आहे.

पर्यायी मार्ग सदरची जड अवजड वाहने सीबीडी सर्कल येथून डावीकडे वळून घेत उरण फाटा पुलाच्या खालून यू टर्न घेऊन सीबीडी उड्डाणपुलावरून पुण्याकडे जाता येणार आहेत. सीबीडी सेक्टर ३ महाकाली चौक येथून सीबीडी सर्कल येथे येणारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग सीबीडी सेक्टर ३ महाकाली चौक, गावस्कर मैदान सर्कल, पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील रस्त्याने भाऊराव पाटील चौकातून जाऊ शकतील, असे पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले आहे.