माथेरानवर पनवेल-धोधाणीमार्गे चढाई करताय, तर जरा जपून जा. या परिसराची संपूर्ण माहिती असणाऱ्याला सोबत घेऊनच या सहलीचा बेत आखा, असा सल्ला देण्याची वेळ नवीन पनवेल पोलिसांवर आली आहे. नवीन पनवेल वसाहतीच्या सेक्टर ७ मध्ये राहणाऱ्या संगणक अभियंत्याला या गिर्यारोहणाचा नुकताच वाईट अनुभव आला. परतीच्या प्रवासात घनदाट जंगलात तो रस्ता चुकला. अखेर पोलीस आणि धोधाणी गावातील तरुणांच्या चार तासांच्या शोधमोहिमेमुळे हा तरुण अभियंता सापडला.
रविवारची सकाळची वेळ, नवीन पनवेल येथे राहणारा समरेश चंद्र मंडळ हा २८ वर्षीय तरुण धोधाणीमार्गे माथेरान डोंगरावर निघाला. इतर ट्रेकरचा मागोवा घेत दुपापर्यंत तो माथेरानपर्यंत पोहोचला. काही तासांच्या विश्रांतीनंतर त्याने दुपारी साडेतीन वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. दुपारच्या उन्हात माथेरानचे जंगल तुडवताना तो थकला. दुपारी साडेचापर्यंत डोंगर पालथा घातल्यावर आपण चुकल्याचे त्याला कळाले. धोधाणीजवळच्या जंगलात आजही जनावरांचा मुक्त वावर आहे. आपण मोठय़ा संकटात सापडल्याचे समरेशला कळाले. आपण संकटात असल्याचे त्याने दूरध्वनीद्वारे आईला कळवले. त्यानंतर समरेशचे वडील चंद्र मंडल यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांना धोधाणीची हद्द नवीन पनवेल पोलीस ठाण्याची असल्याचे उत्तर मिळाले. त्यानंतर नातेवाईकांनी नवीन पनवेल पोलीस ठाणे गाठले. तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते आणि समरेशच्या मोबाइल फोनची बॅटरीही संपली होती.
नवीन पनवेल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आनंदा सावंत यांनी समरेशच्या नातेवाईकांसोबत शोधमोहीम सुरू केली. पोलीस व्हॅन आणि चार पोलिसांसोबत पोलीस अधिकारी सावंत यांचे पथक धोधाणी डोंगराच्या दिशेने रवाना झाले, तोपर्यंत पावणेसात वाजले होते. पोलिसांनी धोधाणी गावातील तरुणांची मदत घेतली. या गावातील पाच तरुणांच्या मदतीने सात वाजता पोलीस व ग्रामस्थ काळोखात समरेशचा शोध घेण्यासाठी डोंगरावर चढले. याच दरम्यान या डोंगरावरून काही ट्रेकर खाली उतरले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर एक तरुण मदतीसाठी हाका मारत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्या ट्रेकरपैकी काही तरुणांना सोबत घेऊन मदतीचा आवाज येत असलेले ठिकाण दाखविण्याची विनंती पोलिसांनी केली. अखेर रात्री साडेआठ वाजता पोलिसांना समरेशचा आवाज एका डोंगराच्या उंच कडय़ावरून ऐकू आला. या आवाजाचा मागोवा घेत पोलीस तेथे पोहोचले व समरेशचा जीव भांडय़ात पडला. आपल्यावर जनावरांचा हल्ला तर होणार नाही ना, या दडपणाखाली आपण होतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. अनोळखी ठिकाणी गिर्यारोहणासाठी जाताना माहीतगार व्यक्तींना सोबत घेऊन जावे, तसेच एकटय़ाने जाणे टाळावे, असे आवाहन नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.

mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
seven injured after machinery in trailer
मुंबई नाशिक महामार्गावर ट्रेलर मधील यंत्र वाहनांवर पडून सात जण जखमी
khair tree costing of rupees 50 lakhs
वसई: महामार्गावर छुप्या मार्गाने खैर तस्करी, भाताणे वनविभागाची कारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त