पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशात सुरू झालेल्या बेटी बचाव, बेटी पढाओ अभियानांर्तगत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रत्यक्षात एका छोटय़ा मुलीला हृदयाशी कवटाळून काढलेली छायाचित्र संपूर्ण नवी मुंबईत झळकत असल्याने त्यांनी या निमित्ताने आपल्या मॉडेलिंगची हौस पूर्ण केल्याचे दिसून आले. म्हात्रे यांच्या पुढाकराने सीबीडी येथे दहा दिवसांचा कला, क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने ३५० लहान मुलींचा सन्मान करण्यात आला.
राज्यातील अनेक राजकारण्यांना चंदेरी दुनियेचे आकर्षण आहे. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत अनेक खासदार, आमदार, नगरसेवकांनी आपली चित्रपट अथवा मॉडेलिंगची हौस येनकेनप्रकारे भागवून घेतली आहे. आता यात ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या बेलापूरच्या आमदार मंदा यांचे नाव समाविष्ट झाले आहे.
माजी मंत्री गणेश नाईक यांना पराभूत केल्याने त्या जास्त चर्चेत राहिलेल्या आहेत. सर्वसाधारपणे लोकप्रतिनिधी आपले कार्यक्रम साजरे करताना नमस्कार, चमत्कार, करताना छबिदार छायाचित्र प्रसिद्ध करीत असल्याचे दिसून येते.
यात काही लोकप्रतिनिधींच्या विविध प्रकारच्या छटा असलेली छायाचित्रे झळकवत असल्याचे दिसून येते. लोकप्रबोधनाचा संदेश देताना स्वत:चा समावेश असलेली छायचित्रे शक्यतो पाहण्यास मिळत नाहीत. म्हात्रे यांनी गेले दहा दिवस सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानात श्री गोवर्धनी माता सामाजिक संस्थेच्या वतीने एक भव्य महोत्सव साजरा केला. अनेक नवोदित कलाकारांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देताना ३५० मुलींचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना बेटी बचाव, बेटी पढाओचा संदेश अंगीकरण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी मुलींसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात फलक लावले जात आहेत.
म्हात्रे यांनी यासाठी शहरात केलेल्या जाहिरातीतील फलकावर सरोज नाईक यांची छोटी मुलगी घेऊन काढलेली छायचित्रे, प्रसिद्ध तुर्भे येथील मंगला घरत यांच्या लहानगीला कडेवर घेऊन छायाचित्रे काढली आहेत. ही छायाचित्रे शहरात मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यामुळे म्हात्रे यांनी यानिमित्ताने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.