उरण शहरातील नागाव रस्त्यावरील पोलीस लाइनच्या रस्त्यावरील जलवाहिनी रविवारी फुटल्याने रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया गेले असून उरण शहरातील अनेक ठिकाणच्या घरगुती जलवाहिन्यांना गळती लागलेली असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे. एकीकडे उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने शहरात दोन दिवसांची पाणी कपात जाहीर केली आहे.तर दुसरीकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
उरण तालुक्यातही अनेक गावांतून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी अनेक संघटनांकडून जनजागरण मोहिमा राबविल्या जात आहेत.मात्र असे असले तरी पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे अनेक छोटय़ा-मोठय़ा जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लिटर पाणी गटारातून वाया जात आहे.
एमआयडीसी, हेटवणे तसेच पुनाडे या तीन धरणांतून पाणीपुरवठा केला जात आहे. या तीन धरणांतील पाणी साठय़ाने तळ गाठला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच या पाणीपुरवठा विभागांनी उरणमधील पाणी कपातीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. अनेकदा पाणी वेळेत येत नाही, तर वारंवार वीज गायब होत असल्याने पाणी असले तरी ते घरात पोहोचत नाही. अशा स्थितीत नागरिक असताना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची गळती सुरूच आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणीच्या अनेक पाणपोया तसेच स्वच्छतागृहांसाठी उभारण्यात आलेल्या साठवण टाक्यातूनही पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रारी करूनही त्यात सुधारणा होताना दिसत नाही. पाणी वाचविण्याची मोहीम राबविणाऱ्या उरण अलाइव्ह ग्रुपने तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.