भाजपच्या उमेदवारांत उत्साह; अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांचा काढता पाय

महापालिकेच्या स्थापनेपासून गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेले उमेदवार, गेले दोन महिने आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिवस-रात्र एक करणारे कार्यकर्ते आणि आपली पाच वर्षे कोणाच्या हातात जाणार याची उत्सुकता असलेले मतदार अशा सर्वाचेच डोळे शुक्रवारी महापालिका निवडणुकीच्या निकालांवर खिळले होते. त्यामुळे सर्वच मतमोजणी केंद्रांवर सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती, मात्र कल भाजपकडे झुकताना पाहून अन्य पक्षांच्या उमेदवारांनी काढता पाय घेतला. त्यानंतर बहुतेक सर्वच मतमोजणी केंद्रांवर केवळ भाजपच्याच कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती.

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
chhatrapati sambhajinagar, paithan, dispute between descendants of sant eknath
पैठणमध्ये नाथवंशजांमधील वाद पुन्हा उफाळला; छाबिना मिरवणूक चार तास रखडली
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

शुक्रवारी सकाळी नऊपासून पनवेलमधील ६ मतमोजणी केंद्रांवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी गर्दी केली. १० वाजता मतमोजणी सुरू झाली. साधारण ११च्या सुमारास खारघर येथील टिळक विद्यालय, नावडे येथील रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय आणि कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय या मतमोजणी केंद्रांवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला.

सकाळी पांढऱ्या शुभ्र पोषाखात आलेले नेते आणि कार्यकर्ते दुपापर्यंत गुलालात न्हाऊन निघाले. सर्व मतमोजणी केंद्रांच्या बाहेर पांढऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतमोजणी केंद्रांवरील भोंग्याचा आवाज केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना ऐकू येत नव्हता. त्यामुळे मतमोजणी झाल्यावर विजयी उमेदवार आपली खास माणसे आकडेवारी जाहीर करण्यासाठी केंद्राबाहेर पाठवत होते. निकाल जाहीर होताच जल्लोषाला उधाण येत होते. विजयी उमेदवार केंद्राबाहेर आल्यावर त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते गुलाल उडवून आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गळ्यात हार घालून उमेदवाराला खांद्यावर बसवून जल्लोष करत होते.

महामार्ग ते मतमोजणी केंद्राजवळच्या मार्गापर्यंत नेमून दिलेल्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, अशा सूचना पोलीस वारंवार करत होते. पनवेलमध्ये कमळ फुलल्यामुळे उन्हाने भाजून निघत असतानाही भाजप कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले होते. काही उत्साही कार्यकर्ते उंचावरील मिळेल त्या जागेवर चढून हातामधील कमळाचे निशाण फडकवत होते. झाडांच्या सावलीत आणि दुकानांच्या शेडखाली कार्यकर्त्यांचे घोळके उभे होते. आपले उमेदवार कधी विजयाचा संदेश घेऊन बाहेर पडतात, याकडे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे डोळे लागले होते. ही बातमी त्यांच्या प्रभागामध्येही लगेच समजावी म्हणून निकाल हाती येताच त्या उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांसमोर फटाके फोडले जात होते.

कोरडय़ा वडाळे तलावात कमळ

रायगड जिल्ह्य़ातील पनवेल या पहिल्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर मतमोजणी सुरू असलेला वडाळे तलावाचा परिसर फटाक्यांच्या आतषबाजीने गजबजला आणि गुलालाच्या उधळणीत रंगून गेला. याच परिसरातील व्ही. के. विद्यालय व कन्या शाळेत मतमोजणी सुरू होती. भाजपच्या आनंदोत्सवामुळे सुकलेला वडाळे तलाव कमळांनी भरून गेल्याचे चित्र निर्माण झाले.  निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे पनवेल शहरातून जाणारा हा मार्ग काही काळ ठप्प झाला होता. भाजपची विजयी घोडदौड पनवेलमध्येही सुरूच ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली होती. भाजपला रोखण्यासाठी शेकापने काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेतले. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चिन्हे होती. ज्यांचे नगरपालिका क्षेत्रावर वर्चस्व होते तोच पक्ष ही महानगरपालिका जिंकणार अशी चर्चा होती. पहिल्या निकाला पासूनच भाजपाने आघाडी घेतली. प्रभाग क्रमांक १४ पासून सुरू झालेल्या मतमोजणीचा कल भाजपाच्या बाजूने झुकल्यामुळे वडाळे तलावाजवळच्या बल्लाळेश्वर मंदिरात शेकाप, काँग्रेस महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, मात्र निकाल विरुद्ध लागत असल्याचे पाहत शेकापच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. नंदनवन सोसायटीजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. या निवडणुकीत महाआघाडीला माजी नगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, तसेच अन्यही काही बडय़ा नेत्यांच्या मुलांना पराभव चाखावा लागला.

भुईमूग, हार, वडापाव, पाण्याच्या बाटल्या

मतमोजणी केंद्रावर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी होती. त्यांच्या पेटपूजेची सोय करणाऱ्यांनी या गर्दीचा पुरेपूर फायदा घेतला. भुईमुगाच्या शेंगांची आणि वडा-पावची विक्री मोठय़ा प्रमाणात झाली. उकाडय़ाने हैराण झालेल्या कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्यामुळे या बाटल्यांची विक्री करणाऱ्यांची मोठी कमाई झाली. विजयी उमेदवारांना जागेवर हार उपलब्ध करून देणाऱ्या सीताबाई यांचाही व्यवसाय वाढला. एरवी ५० ते ६० रुपयांना विकल्या जाणाऱ्या हारांची किंमत शुक्रवारी १०० ते २०० रुपयांवर पोहोचली होती आणि तरीही त्यांना मोठी मागणी होती.

विरोधकांचे टीकास्त्र निष्प्रभ

ती ध्वनिफीत कोणी ‘ऐकली’च नाही!

ठाकूर कुटुंबीय भाजपची ‘भाडय़ाची कंपनी’ करणार असल्याची ध्वनिफीत शेकापने प्रत्येक प्रचारसभेत वाजवली. या फितीमध्ये परेश व रामशेठ ठाकूर यांचे वादग्रस्त संभाषण होते, मात्र या ध्वनिफितीचाही मतदारांवर परिणाम झाला नाही.

आयुक्तांच्या बदलीवरून टीका

भाजपने प्रामाणिकपणे काम करणारे माजी महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याचाही काही फायदा विरोधकांना झाला नाही.

वडाळे तलाव सफाई घोटाळा

ठाकूरांच्या हाती पनवेल नगर परिषदेची सत्ता असताना वडाळे तलाव स्वच्छ करण्याचे काम दासभक्तांनी केले, मात्र या सफाईकामाचे बिल काढून गैरव्यवहार झाला असून त्यामुळे दासभक्तांचा अपमान झाल्याचा आरोप शेकाप नेत्यांकडून करण्यात आला होता. त्याचाही लाभ शेकापला मिळाला नाही.

पक्षांतरावर टीका

शेकाप नेते जयंत पाटील यांनी ठाकूर हे राजकीय स्वार्थापोटी वारंवार पक्षांतर करतात, अशी टीका जाहीर सभेत केली होती. महापालिका निवडणुकीनंतर ठाकूर कोणत्या पक्षात जाणार आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता, तरीही ठाकूर यांची लोकप्रियता कायम राहिल्याचेच या निकालांवरून स्पष्ट झाले आहे.