पनवेल महापालिकेत ५१ जागांवर भाजपचा विजय, शेकाप महाआघाडीला अवघ्या २७ जागा

भाजपच्या कार्यकाळात मिळालेला महापालिकेचा दर्जा, प्रशांत ठाकूर यांच्या कारकीर्दीतील विकासकामांचा अनुभव आणि शहरी मतदारांशी असलेली जवळीक यांच्या जोरावर भाजपने पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शेकापसह सर्वच पक्षांना पाणी पाजले. आतापर्यंत पनवेलमध्ये दबदबा असलेल्या शेकापला या निवडणुकीत मिळालेली मात ही केवळ भाजपच्या पक्षविस्ताराचे फलित नसून महापालिकेमुळे पनवेलला मिळालेला शहरी चेहरादेखील शेकापच्या पराभवास कारणीभूत ठरला. त्याच वेळी पनवेलच्या ग्रामीण भागांतूनही शेकाप महाआघाडीची मुळे खिळखिळी झाल्याचे या निवडणुकीतून दिसून आले.

पनवेल महापालिकेच्या ७८ पैकी तब्बल ५१ जागांवर भाजपने विजय मिळवला, तर ४०हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष महाआघाडीला अवघ्या २७ जागांवर समाधान मानावे लागले. भाजप व भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) युतीने ७८ जागांवर निवडणूक लढविली. शेतकरी कामगार पक्षाचे ४८, काँग्रेसचे १८ व राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ उमेदवार रिंगणात होते. पनवेलमधील सामना दुरंगी होण्याची शक्यता दिसत असतानाच शिवसेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत ७८ जागा लढविल्या. परंतु दोन दिवसांपूर्वी निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाल्यानंतर भाजपच्या विजयाची चर्चा सुरू झाली होती. शुक्रवारी यावर शिक्कामोर्तब झाले.

भाजप आणि ठाकूर पिता-पुत्र अशी शक्ती एकवटल्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडी स्थापन केली. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागांच्या पलीकडे काहीही साधता आले नाही. तर शेकापने २३ जागांपर्यंतच मजल मारली. दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊनही सेनेला भोपळाही फोडता आला नाही.

शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेल्या माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी रामदास पाटील, प्रथमेश सोमण, कैलास पाटील यांचा निभाव लागू शकला नाही. शिवसेनेसोबत गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थिती शिवसेनेसारखीच झाली. मनसेनेच्या मुंबईतील नेत्यांना पनवेलमध्ये स्वारस्य नाही, अशी भावना कार्यकर्त्यांत होती. रासपने या निवडणुकीत नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फोल ठरला. पक्षांतर्गत कलहांत मग्न असलेल्या विरोधकांपेक्षा विकासाचा मंत्रजप करणाऱ्या भाजपलाच मतदारांनी पसंती दिली.

[jwplayer SRIRDjBW]

विकासकामांचा फायदा

ठाकूर पितापुत्रांनी काँग्रेसमध्ये असताना पनवेलकरांना दाखविलेल्या विकासाच्या वाटेनेच पनवेलमधील भाजपच्या विजयाचा मार्ग खुला झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी शेकापकडे तीन वेळा आमदारकी होती. मात्र प्रशांत ठाकूर यांच्या काळात पनवेलचा उड्डाणपूल, नाटय़गृहे, काँक्रीटचे रस्ते, रुग्णालयाचे बांधकाम अशी विविध कामे प्रत्यक्षात होताना पनवेलकरांनी पाहिली, त्यामुळे पनवेल शहरात शेकाप महाआघाडीच्या अवघ्या चार जागा निवडून आल्या. सिडकोची उंच वाढविलेली घरे व या घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकाच दिवशी घेतलेल्या नवीन पनवेल व खारघर येथील सभांमध्ये दिल्यामुळे येथील मतदारांची बहुसंख्य मते भाजपच्या पारडय़ात पडली.

नवीन पनवेल व खारघरमधून शेकापला मोठय़ा प्रमाणात यशाची अपेक्षा होती, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. शेतकऱ्यांचा व कामगारांचा असणारा पक्ष हा पनवेलच्या शहरी मतदारांना आपलासा वाटत नाही. गाववाल्यांचा पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जाते, मात्र या पक्षामधील नेते गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठीही लढा उभारू शकले नाहीत आणि शहरी मतदारांनाही आपलेसे करू शकले नाहीत.

परेश ठाकूर यांना सर्वाधिक मते

रामशेठ ठाकूर यांचे पुत्र परेश ठाकूर सर्वाधिक मतांनी विजयी झाले. त्यांच्या प्रभागात सर्व भाजपचेच उमेदवार निवडून आले आहेत. त्यांना तब्बल ११,२९९ मते मिळाली आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांना १,३५६ तर शेकाप आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना ३,४५५ मते मिळाली आहेत. त्यामुळे परेश ठाकूर विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत.

घराणेशाही सुरूच..

* पनवेलमधील काही राजकीय नेत्यांच्या वारसदारांनी राजकारणाचा वारसा पुढे चालू ठेवला, तर काहींच्या वारसदारांचा मात्र मोदी लाटेत धुव्वा उडाला.

* माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र परेश ठाकूर पहिल्या महापालिकेत नगरसेवक म्हणून विराजमान होणार आहेत. आरपीआयचे जगदीश गायकवाड हे विजयी झाले असून ते माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कविता गायकवाड यांचे पती आहेत.

* जगदीश गायकवाडांसह त्यांच्या भगिनी विद्या गायकवाड यादेखील नगरसेवक पदाच्या मानकरी ठरल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्याम म्हात्रे यांची मुलगी श्रुती म्हात्रे हिचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

मतदान यंत्राशी फेरफार केल्याचा आरोप

पनवेल : भाजपने मतदान यंत्राशी (ईव्हीएम) फेरफार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणीही निवडणूक आयोगाला करण्यात आल्याची माहिती महाआघाडीकडून देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी भाजपविरोधात शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधण्यात आली. तरीही भाजपला एकहाती विजय मिळाला. आघाडीचे नेते माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, ‘मतदान यंत्रांत तांत्रिक बदल करून फेरफार केली असावी. त्यामुळे या यंत्रांची तपासणी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे,’ असे त्यांनी सांगितले. या संबंधीचे पुरावेही सादर करण्याची तयारी पाटील यांनी दर्शवली.

पक्षीय बलाबल

पक्ष         विजय

भाजप        ५१

शेकाप       २३

काँग्रेस       २

राष्ट्रवादी    २