बुचर येथील आगीच्या पाश्र्वभूमीवर रहिवाशांमध्ये घबराट

उरण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असतानाच शनिवार आणि रविवारी उरणमध्ये काळा पाऊस पडला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डाऊर नगर व कोटनाका येथील रहिवाशांनी हे पाणी भरून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा पाऊस बुचर बेटावरील तेल टाकीला लागलेल्या भयंकर आगीमुळे घडला असावा, असा कयास केला जात आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

डाऊर नगर येथील काही ग्रामस्थांनी घराच्या छपरावर पाणी साठवण्यासाठी भांडी मांडली होती. त्या भांडय़ांतील पाण्याचा रंग काळा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चाणजे विभागातील तलाठी कार्यालयाशी संपर्क साधला आणि काळ्या पावसाची माहिती दिली. अशाच प्रकारची घटना उरण शहरातील कोटनाका येथे घडली. शहरात दोन दिवस पाणी न आल्याने येथील विशाल गाडे यांनी पाण्यासाठी बादल्या ठेवल्या होत्या. या बादल्यांत साचलेले पाणी पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी पाणी रात्रभर ठेवले असता, दुसऱ्या दिवशी भांडय़ाच्या तळाशी काळा थर साचलेला दिसल्याचेही त्यांनी सांगितले. उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी काळ्या पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच जैव वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.

काळ्या पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच जैव वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांच्या अहवालानंतर पाणी काळे का झाले हे निष्पन्न होईल. गेल्या तीन दिवसांपासूनच ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे बुचर येथील आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचाच हा परिणाम असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

– कल्पना गोडे, तहसीलदार, उरण