दिघा परिसरातील अनधिकृत इमारतींवर आठवडाभरापासून सुरू असलेल्या कारवाईत बुधवारी केरू प्लाझा ही इमारत पाडण्यात आली. संबंधित रहिवाशांकडून या कारवाईला होणारा विरोध बुधवारी मावळल्याचे दिसून आले.
बुधवारी सकाळपासून एमआयडीसीच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली. रहिवाशांना दिलेल्या सूचनेनुसार शिवराम आणि पार्वती या निवासी इमारतींसह केरू प्लाझा ही इमारत रिकामी करण्यात आली होती. केरू प्लाझा ही टोलेजंग इमारत अतिक्रमणविरोधी पथकाने संध्याकाळपर्यंत जमीनदोस्त केली. यावेळी ‘दिघा घर बचाव संघर्ष समिती’ आणि येथील राहिवासी मात्र कारवाई रोखण्यासाठी पुढे आले नाहीत.

महापालिकेने मालमत्ता कर रद्द केला
शिवराम, पार्वती, केरू प्लाझा या इमारतींना पालिकेकडून मालमत्ता कर मिळत होता. काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार या इमारती निष्कासित करण्यात आल्या. या इमारतींचा मालमत्ता कर तसेच पाणी देयके पालिकेने रद्द केली आहेत.