ठाणे, पनवेलच्या कुटुंबांमधील वाद पोलीस ठाण्यात

बैलांच्या शर्यतीला न्यायालयाने लगाम घातला असला, तरीही आजही छुप्या रीतीने या शर्यती लावल्या जातात, पण पनवेलमध्ये मात्र एका बैलाची मालकी मिळवण्यासाठीच शर्यत लागली आणि मालकी हक्काचा हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला.

ठाण्यातील पडेल गावातील सुमारे चार ते सहा वर्षांचा संग्राम हा बैल अतिशय वेगात धावतो आणि शर्यती जिंकतो असे कळताच हा बैल आपल्याच मालकीचा आहे, असा दावा पनवेल तालुक्यातील तळोजा परिसरातील तुर्भे गावातील रहिवाशांनी केला. २०१३ साली या गावातील नंदकुमार ठोंबरे यांनी मेम्तूर जातीचा ढवळ्या रंगाचा बैल भीमराव बनसोडे यांच्याकडून खरेदी केला होता. त्याचा करारनामा ठोंबरे कुटुंबीयांनी सादर केला. त्याच वेळी या बैलाचा ताबा सध्या ज्यांच्याकडे आहे, त्या पडेल गावचे विष्णू पाटील यांनी अडीच लाख रुपयांना हा बैल खरेदी केल्याचे दस्तावेज पोलिसांना सादर केले. पाटील यांनी कौपरखैरणे येथील शफिक पटेल यांच्याकडून हा बैल खरेदी केल्याचा दावा केला आहे. ठोंबरे यांचा बैल पटेल यांच्यापर्यंत कसा पोहोचला, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

या प्रकरणामुळे अजूनही बैलांच्या शर्यती सुरू असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळला आहे. पनवेल परिसर आता विमानतळामुळे ओळखला जात असला तरी पूर्वीपासून तो बैलांच्या शर्यतींसाठी ओळखला जातो. त्यामुळे बैलाचा ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या खटाटोपाचा हा किस्सा तळोजा पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत रंगला. रायगड, ठाण्यातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पांढऱ्या गाडय़ांची रांग लागली होती. एरवी पोलीस ठाण्यात पुजेच्या दिवशी, मोठी भांडणे झाल्यास आणि शांतता समितीची बैठक बोलावल्यासच, अशा रांगा पाहायला मिळतात.

प्रतिष्ठेसाठी बैलशर्यत..

पनवेलमधील बैलाच्या शर्यती बंद झाल्या आहेत. परंतु आजही तिथे बैल बाळगणारे व त्यांचे पालन-पोषण करणारे मालक आहेत. शर्यती घाटमाथ्यावरील जत्रांमध्ये होत असल्याने या बैलांना तिथेच ठेवले जाते. पाडस असल्यापासून बैल तारुण होईपर्यंत त्याची काळजी घेण्यासाठी एक शेतकरी कुटुंब नेमले जाते. खुराकासाठी दिवसाला पाचशे ते हजार रुपये खर्च केले जातात. बदाम, काजूची पेंड, उच्च प्रतीचे मद्य दिले जाते. हवेशीर आणि उजेड असणाऱ्या गोठय़ात हे बैल बांधले जातात. त्यांना वेळेवर आंघोळ, तेलाने मसाज केला जातो. या बैलांची किंमत २ ते ५० लाखांच्या दरम्यान असल्याचे हे मालक सांगतात. हा सर्व खटाटोप सुरू असतो तो प्रतिष्ठेसाठी!