उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सूचना

महाराष्ट्रात यंदा पावसाने ओढ दिल्याने सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. या कमी पावसाचा फटका औद्योगिक वसाहतींनाही बसला असून तळोजा औद्योगिक वसाहतीत पाणी कपात सुरू केल्याने उद्योजकांचे धाबे दणाणले आहे. यावर उपाय म्हणून उद्योजकांनी विंधणविहिरी खोदाव्यात, अशी सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. तळोजा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनला २५ वर्षे पूर्ण झाल्याबाबत नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी ही सूचना केली. विशेष म्हणजे सरकारने यापूर्वी उद्योजकांना ही परवानगी नाकारली होती.
या वेळी देसाई यांनी ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा देत अनेक विदेशी कंपन्या राज्यात उद्योग उभारण्यासाठी तयार असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्य़ाात १२ ठिकाणी वस्त्रोद्योग केंद्र सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.
युतीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. या विस्तार व नियुक्त्यांसाठी शिवसेना तयार आहे, मात्र भाजपकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप देसाई यांनी या वेळी केला.