विनोद कोट्टिल, गणपती नाडार, ईश्वरन रटीनम हे तीन मित्र. तिघांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या; पण तिघांनाही परदेशी संस्कृतीचे आकर्षण. त्यांचं वैविध्य त्यांनी एकत्र आणलं आणि कोपरखैरणेत सुरू झाले कॅफे ब्लॉसम.. या छोटय़ाशा हॉटेलमध्ये फळं, आइस्क्रीम, चाट मसाला यांच्यापासून तयार केलेल्या विविध डेझर्ट्सचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. शिवाय विविध प्रकारची सँडविचेस, पास्ता, मिल्कशेक्सही उपलब्ध आहेत.

थोडी हटके अंतर्गत सजावट असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन काही तरी वेगळं, मजेदार खाण्याची आवड तुम्हाला असेल, तर कोपरखैरणेतील कॅफे ब्लॉसम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. सफरचंद, द्राक्षे, चेरी, संत्री अशी वेगवेगळी फळे, विविध चवींची आइस्क्रीम्स त्यावर चाट मसाल्यांची पेरण या सगळ्याचं आकर्षक सादरीकरण आणि सुखावणारी अंतर्गत सजावट या सगळ्याचा मिलाफ या हॉटेलमध्ये झाला आहे.

विनोद कोट्टिल, गणपती नाडार, ईश्वरन रटीनम या तीन दक्षिणेकडील मित्रांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये हे हॉटेल सुरू केले. तिघाही मित्रांना विविध पदार्थाच्या चवी चाखण्याची भारी हौस. या हौसेतूनच हे हॉटेल सुरू झाले. इथे फ्रुट सॅलड विथ आइस्क्रीम हे फ्यूजन उपलब्ध आहे. इथल्या पदार्थामध्ये चव आणि पोषणाचा मेळ साधल्याचा दावा चालक करतात. फळे ही अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट्स असतात. अभ्यासकांच्या मते रोज ५ ते १० वेगवेगळ्या फळांचे सेवन केल्यास आरोग्यास लाभ होतो, अशी पुस्ती हॉटेलचालक जोडतात.

आजकाल सर्वाना परदेशी संस्कृतीचे आकर्षण आहे. तरुणाईला तर अधिकच आकर्षण आहे. त्यामुळेच अरेबियन, ब्रिटिश आणि भारतीय पदार्थाचे फ्यूजन करण्यात आले आहे. उन्हाळ्यासाठी खास आरोग्यवर्धक आणि शरीराला गारवा देणारे पदार्थ खवय्यांना पेश करण्यात येत आहेत. फ्रुट सॅलड विथ आइस्क्रीम ही त्यांची सर्वात लोकप्रिय रेसिपी आहे. सॅलड्सवर व्हॅनिला आइस्क्रीम व सुकामेवा, चेरी टॉपिंग्ज म्हणून वापरण्यात येतात. त्यासाठी रोज ५ किलो साखर, ५ किलो विविध प्रकारची फळे वापरली जातात. ही फळे दादर येथील विक्रेत्यांकडून आणली जातात. आइस्क्रीममध्ये वापरण्यात येणाऱ्या साखरेचे व सुक्या मेव्याचे प्रमाण ग्राहकांच्या मागणीनुसार ठेवण्यात येते.

हॉटेल डेझर्ट्ससाठी प्रसिद्ध असले, तरीही तिथे पास्ता, विविध प्रकारची सॅण्डविचेसही मिळतात. गणपती नाडार म्हणतात की, अरबस्थानातील हवामान आणि आपल्या देशातील हवामान सारखेच आहे. त्यामुळे तेथील पदार्थ हे भारतीयांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. काबुली चणे, ऑलिव्ह ऑइल, चिकन व मसाले वापरून बनविलेले पदार्थ लोकप्रिय आहेत. बॉम्बे शेझवान सॅण्डविच, पेस्टो सॅण्डविच, क्लब सॅण्डविच. स्पिनॅच कॉर्न सॅण्डविच, ज्युस, मिल्कशेक येथे उपलब्ध आहेत. गुजराती पद्धतीचा चहा या हॉटेलमध्ये मिळतो. त्यासाठीचा मसाला या दुकानात बनविला जातो. त्यासाठी गवती चहा, लवंग, काळी मिरी, वेलची अशी सामग्री वापरली जाते. इथे लाइव्ह किचन असल्यामुळे ग्राहकांना कोणत्याही शंका ठेवण्यासाठी जागाच नाही. ८ स्वयंपाकी आहेत. ते पदार्थाचा दर्जा आणि प्रमाण योग्य राखण्यावर भर देतात. येथे वापरले जाणारे सॉस येथील स्वयंपाकी स्वत:च तयार करतात. कोपरखैरणे भागात होम डिलिव्हरीची सोय करण्यात आली आहे. याशिवाय झोमॅटो आणि स्विगीवरून ऑनलाइन ऑर्डरही स्वीकारण्यात येतात.

अनोखी अंतर्गत सजावट

कॅफे ब्लॉसमच्या अंतर्गत सजावटीवर आणि वातावरणनिर्मितीवर खास लक्ष देण्यात आल्याचे आत प्रवेश करताक्षणी जाणवते. लेडी गागा, इंग्लंडची राणी यांच्या तसबिरींनी इथल्या भिंती सजवण्यात आल्या आहेत. ब्रिटिशांच्या संकल्पनेतून साकारलेल्या डबलडेकर बसची प्रतिकृती लंडन ते मुंबई प्रवास करताना दाखवण्यात आली आहे. इंग्रजांच्या काळातील क्लासिक कार व बाइकची छायाचित्रे सर्वाचे लक्ष वेधून घेतात. सेल्फी कॉर्नरसमोर फोटो काढण्यात वेळ सहज निघून जातो. इथे पाण्याच्या बाटलीत पुदिन्याची पाने टाकून पाण्यालाही खास बनवण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे पाण्याला चांगला स्वाद येतो आणि अन्न पचनासही हातभार लागतो, असे येथील व्यवस्थापक रोहित सिंग सांगतात. कॅफे ब्लॉसमच्या शाखा ठाणे येथील कोरम मॉल, दुबई, भांडुप व चेन्नई येथे आहेत. ‘इट गुड फिल गुड’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करतो, असे सिंग सांगतात.

कॅफे ब्लॉसम

  • कधी- सकाळी ११ ते रात्री ११ वा.
  • कुठे – शॉप नं. १२, कलश वैभव, प्लॉट नं. २, कलश उद्यान, सेक्टर-११, कोपरखैरणे.