उरण पोलीस ठाण्याच्या विविध विभागांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी ठाण्यातील व्हरांडय़ात सहा डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या कॅमेऱ्यांमुळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी व येथील कारभारावर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या कामात सुधारणा होऊन कामालाही चालना मिळणार आहे. यापूर्वी पोलिसांनी उरण शहर तसेच उरणमध्ये प्रवेश होत असलेल्या प्रमुख नाक्यांवर नजर ठेवण्यासाठी उरण पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून तालुक्यातील घटनांवर या कॅमेऱ्यांची नजर आहे.दोन वर्षांपूर्वी उरण पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून चोरीतील हस्तगत करण्यात आलेली जवळपास ८० लाखांची रोकड चोरीला गेली होती. या मुद्देमालाच्या ठिकाणी कॅमेरा नसल्याने या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांना काही महिने तपास करावा लागला. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची गरज भासत होती.