आम्ही नथुराम गोडसे यांना राष्ट्रभक्त मानतो, म्हणून त्यांचा शौर्य दिन साजरा करतो, असे सांगत पनवेलमधील सनातन संस्थेने रविवारी शौर्यदिन कार्यक्रमात सहभाग घेतला.

‘महाराणा प्रताप बटालियन’ या संघटनेने साजरा केलेल्या नथुराम गोडसे व नारायण आपटे यांच्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमात ‘सनातन’चे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सहभाग घेतला. नवीन पनवेलमधील सेक्टर १ येथील पृथ्वी सभागृहात २००८ पासून शौयदिन साजरा केला जातो. मात्र यंदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला जोरदार विरोध केला. या वेळी काँग्रेसचे ५० कार्यकर्ते उपस्थित होते. सभागृहाबाहेर जोरदार निदर्शने केली. या वेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची परंपरा २००८ पासून महाराणा प्रताप बटालियन या संघटनेने सुरू केली आहे. सुरुवातीला या सोहळ्यात पाच ते दहा जण जमा होऊन हा सोहळा साजरा होत असे. पनवेलच्या काही राजकीय पक्षांचे नेते सुरुवातीला यात सामील झाले होते; परंतु यंदा या सोहळ्याला मोठय़ा संख्येने लोक जमा झाले होते. याला काँग्रेसने विरोध करीत या सोहळ्याला गोडसे मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
दरम्यान, हिंदू महासभेने गोडसे यांच्या ६६व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावर संकेतस्थळाचे अनावरण केले. दिल्लीतील हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी ही माहिती दिली.मात्र या कृतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समर्थन दिलेले नाही.