विमानतळ परिसरामुळे इमारतींच्या उंचीवर मर्यादा

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी आजूबाजूच्या २५ किलोमीटर परिसरातील इमारतींच्या उंचीवर घालण्यात आलेल्या मर्यादेमुळे सिडकोचा ‘खारघर हिल प्लॅटय़ू’ प्रकल्प कायमचा बारगळला आहे. समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंच असलेल्या या टेकडीवर एक इंचदेखील बांधकाम करता येण्यासारखे नाही. या ठिकाणी ‘हॉलीवूड हिल’च्या धर्तीवर ‘बॉलीवूड हिल’ प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यासाठी सात वर्षांपूर्वी या जमिनीसाठी १ हजार ५३० कोटी रुपये देकार आला होता. या महसुलावर सिडकोला आता पाणी सोडावे लागणार आहे.

नवी मुंबई शहर प्रकल्प उभारताना सिडकोने खासगी जमिनीबरोबर मोठय़ा प्रमाणात शासकीय जमीनही संपादित केली होती. त्यात सह्य़ाद्रीच्या पश्चिम घाटातील एक भाग असलेल्या खारघर हिल प्लॅटय़ूचा म्हणजेच पांडव कडय़ाच्या वरील भागाचाही समावेश आहे. या डोंगरावरील २५० एकर जमिनीवर एक थीम सिटी उभारण्याचा प्रस्ताव नोव्हेंबर २००८ मध्ये तयार करण्यात आला होता. सिडकोने या जमिनीचा आराखडा तयार करून जानेवारी २०१० मध्ये निविदा तयार केली होती. त्या जमिनीवर हॉलिवूड हिल प्रमाणे एक बॉलीवूड हिल तयार करता येईल या उद्देशाने ‘फ्यूचर सिटी प्रॉपट्र्रीज’ने एक हजार ५३० कोटी रुपयांचा देकार या जमिनीसाठी दिला होता. त्यावेळी इंडिया बुल्स, जीव्हीके, एचसीसी या बांधकाम क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांनी ही जमीन खरेदी करण्यात रस दाखविला होता. या कंपन्याचा मनोरंजन अथवा आयटी क्षेत्र उभारण्याचा मानस होता. या ठिकाणी एक वाढीव एफएसआय देऊन वाणिज्यिक व निवासी अशा दोन्ही परवानग्या देण्यात येणार होत्या. जमिनीच्या ६० टक्के भागावर थिम पार्क तर ४० टक्के जमिनीवर निवासस्थानांचा प्रस्ताव होता. या जमिनीत सिडको आपला २६ टक्के हिस्सा कायम ठेवलेला आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) कोणत्याही बांधकामाला १२० मीटरपेक्षा उंच बांधकामाला परवानगी नाही. त्यामुळे अनेक गृहप्रकल्प रखडले आहेत. विमानतळ प्राधिकरणाने घातलेली उंचीची मर्यादा पाहून या प्रकल्पात रस घेतलेल्या विकासकांनी यापूर्वीच माघार घेतली आहे, मात्र त्यामुळे कोटय़वधी रुपयांची खारघर हिल प्लॅटय़ूची जमीन विक्रीविना पडली  आहे. ही जमीन समुद्रसपाटीपासून दोनशे मीटर उंच असल्यामुळे या पठारावर आता कोणत्याही प्रकारचे उंच बांधकाम होणार नाही. त्यामुळे या पठारावर उंचीची मर्यादा शिथिल करावी यासाठी सिडकोने अनेकवेळा विमानतळ प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे पण त्यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने ही जमीन कवडीमोल झाली आहे.

बॉलीवूड हिल

अमेरिकेतील हॉलीवूड हिल्सप्रमाणे ही बॉलीवूड हिल विकसित केली जाणार होती. चित्रपट निर्मितीसाठी लागणारे सर्व अद्ययावत आणि आधुनिक तंत्र या चित्रनगरीत उपलब्ध ठेवण्यात येणार होते. त्यात इनडोअर आऊटडोर चित्रीकरणाची सोय करण्यात येणार होती. मोनोरेलपासून ते रेल्वे स्थानकापर्यंत शूटिंग स्पॉटची निर्मिती केली जाणार होती. पंचतारांकित हॉटेल्सपासून फिल्म इन्स्टिटय़ूटपर्यंतच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार होत्या. या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे २२ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार होता.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या उंचीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे खारघर हिल प्लॅटय़ू प्रकल्प पुढे नेणे शक्य होणार नाही. त्याऐवजी त्या जमिनीचा काय वापर करता येईल याचा विचार सुरू आहे.

-भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको