अल्प व मध्यम उत्पन्नगटांना संधी; द्रोणागिरी, उलवा भागांत जागेचा शोध

खारघर, तळोजा, घणसोली, द्रोणागिरी या ठिकाणी सिडकोने १५ हजार घरे बांधण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. काम सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तळोजा येथील घरांसाठी पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने सिडको या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. हे काम प्रगतिपथावर असताना आणखी १५ हजार घरे बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू केला आहे. सिडकोने येत्या पाच वर्षांत ५५ हजार घरे बांधण्याचे आश्वासन सरकारला दिले आहे. पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांच्या उभारणीला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे.

खारघर सेक्टर ३६ येथे मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी तीन हजार घरांच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पानंतर सिडकोने याच भागात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी गृहप्रकल्प उभारला आहे. दोन्ही गृहप्रकल्प मिळून बांधण्यात येणाऱ्या या पाच हजार घरांच्या निर्मितीनंतर सिडकोने खारघर, तळोजा, घणसोली, द्रोणागिरी या ठिकाणी उपलब्ध जागेनुसार १५ हजार घरे बांधण्याची निविदा सहा महिन्यांपूर्वीच दिली आहे. या प्रकल्पातील तळोजा येथील तीन हजार घरांच्या विकास आराखडय़ाला आता पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे. सिडकोचा नियोजन विभाग या परवानगीच्या प्रतीक्षेत असून या महिनाअखेर ही परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर पुढील महिन्यात या १५ हजार घरांच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.

हा प्रकल्प सुरू होत नाही तोच सिडकोने दक्षिण नवी मुंबईत विस्तीर्ण जागेचा शोध सुरू केला आहे. सिडकोकडे आता हजारो एकर जमीन एकाच ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे नियोजन विभाग द्रोणागिरी, उलवा या भागांत या दुसऱ्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमिनीचा शोध घेत आहे. या ठिकाणीही अल्प व मध्यम उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी १५ हजार घरे बांधली जाणार आहेत. त्यामुळे दोन वर्षांत सिडको ३० हजार घरांच्या उभारणीला समांतर सुरुवात करणार आहे.

सिडकोच्या गृहनिर्मितीनंतर नवी मुंबईत कृत्रिमरीत्या फुगविण्यात आलेले घरांचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात महारेरामुळे अगोदरच बोगस विकासकांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली असल्याने बडय़ा विकासकांनी छोटी घरे बांधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येत्या काळात महामुंबईत स्वस्त घरांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होणार आहे. ही घरे १५ लाखांपासून उपलब्ध होऊ शकणार आहेत.सिडकोने ५० हजारांपेक्षा जास्त घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. १५ हजार घरांच्या बांधकामाला आता लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर वर्षांअखेर आणखी १५ हजार घरे बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको