खारघर येथील सिडकोच्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहसंकुलात सोडतीद्वारे घर मिळण्याची स्वप्नपूर्ती झाली असली तरी अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थीनी अद्याप पैसे न भरल्याने घरांची पूर्ती झालेली नाही. काहींनी वेळेत हप्ते न भरल्याने तो भरण्यासाठी आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. तीन हजार ५९० घरांच्या या संकुलातील ९०० लाभार्थीना या मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे.

सिडकोने खारघर सेक्टर-३६ येथे दोन वर्षांपूर्वी साडेतीन हजार घरांची स्वप्नपूर्ती प्रकल्प हाती घेतला. या घरांची सोडत काढून त्यातील घरे जाहीर करण्यात आलेली आहेत. सोडतीद्वारे लागलेल्या घरांचे सहा महिन्यांत हप्ते भरण्याची अट घालण्यात आली आहे. सिडकोचा प्रकल्प असल्याने वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था या घरांना तत्काळ गृहकर्ज मंजूर करीत आहेत; पण प्रकल्प पूर्ण झालेला नसताना केवळ गृहकर्जाचे हप्ते भरण्यात लाभार्थीचे पगार खर्च होत आहेत. त्यात काही लाभार्थी भाडय़ाच्या घरात आहेत, तसेच काहीजण जुने कर्ज फेडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक लाभार्थीनी त्याबाबत सिडकोकडे तक्रारी केलेल्या आहेत. यात अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थीची तर आर्थिक कणाच मोडून गेला आहे. त्यात आर्थिक मंदीचे सावट असल्याने बँकांचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. त्यामुळे हे हप्ते भरण्यास पूर्वी असलेली सहा महिन्यांची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढवून देण्याचा प्रस्ताव सिडको प्रशासनाने तयार केला आहे. तो लवकरच संचालक मंडळाच्या मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ५३४ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात २८० ते ३५० चौरस फुटाची छोटी घरे असून ती १६ ते २५ लाख रुपयापर्यंत पडली आहेत. हप्ते भरण्यास उशिर झाला तर सिडको त्यांना दंड आकारत आहे. हा गृहप्रकल्प मे २०१६ रोजी पूर्ण करण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. हा प्रकल्प आणखी एक वर्षे रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.