ऐरोली दिवागाव येथील स्मशनभूमीनजीक सिडकोच्या आरक्षित भूखंडावर केलेले दुमजली इमारतीचे अनाधिकृत बांधकाम सिडकोने गुरुवारी जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

अनधिकृत बांधकांमावर उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार कारवाई होत असताना नवरात्रोत्सव, दिवाळीसारख्या सणासुदीमुळे कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. या थांबलेल्या कारवाईचा फायदा घेत बांधकाम व्यावसायिकांनी पुन्हा अनधिकृत बांधकामे सुरू केली होती. मात्र दिवा गाव येथे मार्केटसाठी आरक्षित असणाऱ्या भूखंडावर बांधलेल्या दुमजली इमारतीवर जेसीपी चालवत आरिक्षत भुखंड अतिक्रमणमुक्त केला. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यांसदर्भात सिडकोचे अतिक्रमण आधिकारी पी. बी. राजपुत म्हणाले की, सिडकोचा जागेवर ज्या विकासकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्याच्याविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असून कारवाईचा खर्च वसूल करण्यात येणार आहे. तसेच या आरक्षित भूखंडावर कुंपण टाकण्यात येणार आहे.