महत्वाकांक्षी प्रकल्पात केंद्राचेही लक्ष

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर मुंबईतील सिडकोच्या निर्मल भवन कार्यालयात या प्रकल्पाविषयी सादरीकरणाद्वारे सर्व माहिती घेतली. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी आता केंद्राने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पग्रस्तांनी ऐनवेळी पुढे केलेल्या काही प्रलंबित मागण्यांमुळे असहकार पुकारला असल्याने या प्रकल्पाच्या कामाला काही अंशी खीळ बसली आहे.

मागील महिन्यात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राजू गजपती यांनी नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची हवाई पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी कल्याणजवळील स्वातंत्र्यपूर्व काळातील नौदलाच्या बेसकॅम्पचीदेखील पाहणी केली. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी आपली आडमुठी भूमिका न सोडल्यास विमानतळाची जागा स्थलांतरित करण्यात येईल असे सूतोवाचदेखील त्यांनी केले होते. त्यामुळे नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्र, गुंतवणूकदार, सिडकोत हलचल निर्माण झाली होती मात्र हस्तांतराची हाकाटी हा नंतर फुसका बार निघाल्याचे उघडकीस आले. सिडकोने विमानतळ क्षेत्रातील तीन हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या स्थापत्य कामातील सपाटीकरणाची दोन कामे नुकतीच सुरू केलेली आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळ होणार हे आता काळ्या दगडावरील रेष असल्याचे जाणकारांचे मत आहे. येत्या दोन महिन्यांत या कामाची अंतिम आर्थिक पात्रता निविदा दाखल होणार असून त्यात चार आंतरराष्ट्रीय कंपन्या स्पर्धेत आहेत. विमानतळाच्या प्रस्तावित जमिनीतील दहा गावे स्थलांतरित करताना सिडकोला तारेवरची कसरत करावी लागणार असून प्रकल्पग्रस्तांनी ऐनवेळी काही जाचक अटी व मागण्या पुढे केल्याने सिडकोची अडचण निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने आता थेट केंद्र सरकारकडून या प्रकल्पावर देखरेख ठेवली जाणार असून त्याचा एक भाग म्हणून राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी गुरुवारी या प्रकल्पाची जागेसह सर्व माहिती घेतली. या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी उपस्थित होते.