पनवेलकरांनो, फक्त तुमच्यासाठी

पनवेल पालिकेसाठी काम करणाऱ्या  ७८ सफाई कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांचे हक्काचे वेतन कंत्राटदाराने दिले नसतानाही पनवेलकरांची दिवाळी स्वच्छ व निरोगी जावी, यासाठी मागील तीन दिवसांपासून हे कामगार रस्त्यावर उतरले आहेत. या कामगारांना ऑगस्ट महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ऐन सणासुदीत त्यांच्या घराची परिस्थिती बेताची आहे. मात्र असे असतानाही या कामगारांनी पोटाला चिमटा काढत कर्तव्याला प्राधान्य दिले आहे.

पनवेल शहर पालिका प्रशासन आणि कचरा उचलण्याचा ठेका दिलेल्या समीक्षा कन्स्ट्रक्शन यांच्यामधील वादामुळे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या ७८ सफाई कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. दोन दिवसांपूर्वी या कामगारांनी काम बंद करून प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष वेधले होते. मात्र सकाळी नऊ वाजता केलेले आंदोलन दुपारी मागे घेताना काम पुन्हा सुरू करण्यात आले. हे करण्यामागे वेतनासाठी पनवेलकरांना वेठीस धरले जात असल्याचा संदेश ऐन दिवाळीत जाऊ नये, अशी भावना कामगारांची होती. मात्र समीक्षा कंपनीचे व्यवस्थापन व पालिका प्रशासन यांनी सणासुदीच्या काळातही या प्रश्नावर कोणताही सुवर्णमध्य काढण्यात तत्परता न दाखवल्याने या कामगारांचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.

कामगारांचे सर्व स्तरांतून कौतुक

शहरातील रहिवाशांच्या व सफाई कामगारांच्या हितासाठी पालिकेने समीक्षा कंपनीचा ठेका रद्द केल्यानंतर सफाई कामगारांनी केलेल्या विनंतीवरून पालिकेतील इतर कामगार पुरविणाऱ्या पूर्वा कंपनीच्या माध्यमातून कामगारांना कामासाठी नेमण्यात आले आहे. पूर्वा कंपनीच्या मार्फत दिवसाला ४८० रुपयांची मंजुरी या कामगारांना मिळणार आहे. परंतु मागील दोन महिन्यांचे वेतन व दिवाळी सानुग्रह अनुदानाचा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. तरीही हे कामगार पनवेलकरांसाठी काम करण्यास तयार असल्यामुळे या कामगारांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.