सुविधेचा फज्जा; अस्वच्छता, बिघाडांमुळे निरुपयोगी

नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर मोठा गवगवा करत उभारलेल्या ई-स्वच्छतागृहांची दोन वर्षांत दुरवस्था झाली आहे. तिथे बसवण्यात आलेले कॉइन बॉक्स चोरीला गेले आहेत. तेथील अस्वच्छतेमुळे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. काही ठिकाणी नाणे टाकूनही स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडत नाही, तर काही ठिकाणी नाणे न टाकताही वापर सुरू आहे. काही ठिकाणची ई-स्वच्छतागृहे गर्दुल्ले, भिकारी आणि तृतीयपंथींचा अड्डा बनली आहेत.

ठाणे-बेलापूर मार्गावर ९ ठिकाणी लाखो रुपये खर्च करून ई-स्वच्छतागृहे उभारण्यात आली. १, २ किंवा ५ रुपयांचे नाणे टाकून वापर करण्याची सोय या स्वच्छतागृहांत होती, मात्र अल्पावधीतच या यंत्रणेत बिघाड निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी पाच रुपयांचे नाणे टाकल्याशिवाय स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडत नाही. काही ठिकाणी टाकलेले नाणे पेटीत न जाता बाहेर पडते. ई-स्वच्छतागृहांतील पाणी आणि वीज रात्री बंद होते. त्यामुळे रात्री ती निरुपयोगी ठरतात.

महापे नाका, तळवली नाका येथील ई-स्वच्छतागृहे गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहेत. या ठिकाणची नाणेपेटी कुलूप तोडून लांबवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी गर्दुल्ले पेटीचे कुलूप तोडून पैसे काढून नेत आहेत. त्यामुळे ई-टॉयलेटच्या स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास तेथील दूरध्वनी उचलला जात नाही.

तृतीयपंथींचा अड्डा

महापे, घणसोली, तळवली या रस्त्यावर रात्री तृतीयपंथींचा मोठय़ा प्रमाणात वावर असतो. रात्री उशिरा पोलीस या तृतीयपंथींवर कारवाई करतात. मात्र इतर वेळी या स्वच्छतागृहांचा वापर एखाद्या रात्रनिवाऱ्याप्रमाणे केला जातो. अनेक वस्तूदेखील या ई-स्वच्छतागृहांत लपवल्या जातात.

ई-स्वच्छतागृहांची ठिकाणे

पावणे उड्डाणपूल, महापे स्कायवॉकजवळ, एमआयडीसी कार्यालयाजवळ, रिलायन्स कंपनीजवळ, तळवली नाका, रबाळे पोलीस ठाण्याजवळ, सिमेन्स कंपनी व उरण जंक्शन.

ई-स्वच्छतागृहात नाणे टाकूनदेखील दरवाजा उघडत नाही. तीन नाणी टाकल्यानंतरही दरवाजा उघडत नाही. अस्वच्छता हा तर मोठाच प्रश्न आहे.  सागर कांबळे, नागरिक