मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) धर्तीवर नवी मुंबईत खारघर येथे खारघर कॉर्पोरेट पार्क (केसीपी) उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्याच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. यासाठी सिडकोने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांकडून स्वारस्य निविदा मागविल्या आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने १९७७ पासून वांद्रे-कुर्ला संकुल विकसित केले जात आहे. ती प्रक्रिया आजतागायत सुरू आहे. बीकेसीतील विस्र्तीण भूखंड, योग्य नियोजन आणि मोकळ्या जागेमुळे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, सेबी, नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूटीआय, आयसीआयसीआय, अ‍ॅमेझॉनसारख्या देशविदेशातील ५० पेक्षा जास्त खासगी कंपन्या, संस्थांची मुख्यालये व वाणिज्य केंद्रे बीकेसीत आहेत. यातील काही संस्थांची कार्यालये ही आकर्षक आणि लक्षवेधी आहेत. त्याच धर्तीवर सिडकोने खारघर येथील १२० हेक्टर जमिनीवर खारघर कॉर्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने खारघर, कळंबोली, कामोठे, द्रोणागिरी, पनवेल, पुष्पकनगर या भागांना केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाशिवाय स्मार्ट सिटी बनविण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कॉर्पोरेट पार्कसाठी खारघरमधील १८५० हेक्टर जमिनींपैकी १२० हेक्टर जमीन आरक्षित ठेवण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना १५ वर्षांचा नगर नियोजनाचा अनुभव असणे अपेक्षित धरण्यात आले आहे. सल्लागारांवर नियोजन, वास्तुरचना, सुशोभीकरण, पाणी, वीज, मलनि:सारण, सार्वजनिक स्वच्छतालय, घनकचरा व्यवस्थापन यांचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सिडकोने सोपविली आहे.

परदेशातील सल्लागारांना भारतात एखादे शहर विकसित करण्याचा अनुभव असावा, अशी अट घालण्यात आली आहे. या ठिकाणी सिडको केवळ भूखंड विक्री करणार असून खासगी व शासकीय संस्था आपली कार्यालये उभारणार आहेत.

१२० हेक्टरवर विकास

खारघर येथील सेंट्रल पार्कच्या परिसरात सेक्टर २४ येथे १२० हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणारे हे केसीपी वाणिज्य संकुल बीकेसीपेक्षा अद्ययावत व आधुनिक असेल, असा सिडकोचा दावा आहे.