नवी मुंबईतील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणारा अधिकारमुक्त जमीन (फ्री होल्ड लॅण्ड) आणि खासगी शाळांमध्ये शालेय वस्तू खरेदी करताना केल्या जाणाऱ्या सक्तीच्या विरोधात लोकचळवळ उभारणार आहे. शनिवारी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत या प्रश्नावर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. शहरातील सर्व जमीन आजही सिडकोच्या ताब्यात आहे. ती नागरिकांना भाडेपट्टय़ावर दिलेली आहे. त्यामुळे रहिवाशी मालक असून मालक नसल्यासारखी स्थिती आहे. या विरोधात माजी खासदार संजीव नाईक यांनी आवाज उठविला होता; पण त्यात पाठपुरावा न झाल्याने तो प्रश्न आजही प्रलंबित आहे. त्यामुळे आता जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांना हात घालण्याचा निर्णय स्थानिक काँग्रेसने घेतला आहे.

एके काळी नवी मुंबईवर वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसची आजची स्थिती अत्यंत केविलवाणी आहे. दिघा येथील एका प्रभाग निवडणुकीत या पक्षाने शिवसेना व भाजपची मदत घेऊन आपले हसे करून घेतले. ऐन निवडणुकींच्या तोंडावर असे अनेक आत्मघातकी निर्णय या पक्षाने यापूर्वी स्थानिक पातळीवर घेतले आहेत. त्या पक्षात अलीकडे काही नवीन पदभार देण्यात आले आहेत. शनिवारी (ता. ३०) होणाऱ्या मासिक सभेत शहराला भेडसावणाऱ्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यात ‘फ्री होल्ड लॅण्ड’चा विषय महत्त्वाचा आहे.

सिडकोच्या ताब्यात असलेल्या जमिनीमुळे सिडकोला आजही विकास शुल्क भरावे लागत आहे. याच वेळी रहिवाशी बांधकाम परवानगी घेताना पािलकेलाही विकास शुल्क भरत असल्याने एका घरासाठी रहिवाशी दोन वेळा विकास शुल्क भरत आहेत. सिडकोने ६० वर्षांच्या लीजवर ही जमीन ग्राहकांना दिली आहे. त्यामुळे आणखी १५ वर्षांनी सिडको लीजवर दिलेल्या पहिल्या जमिनीवर भाडेपट्टा घेऊ शकणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिल्डरांची मक्तेदारी संपुष्टात यावी यासाठी इमारतीच्या खाली असलेली जमीनही सोसायटीच्या नावावर करण्याची प्रक्रिया डीम्ड कन्व्हेन्सद्वारे सुरू केलेली आहे, मात्र सिडको एक शासकीय महामंडळ असताना ती जमिनीचा ताबा स्वत:कडे कायम ठेवत आहे.

मक्तेदारी मोडणार

माजी खासदार संजीव नाईक यांनी मध्यंतरी आवाज उठविला होता; पण त्यावर लोकचळवळ उभारली नाही. ती चळवळ उभी करण्याचे काम काँग्रेस करणार आहे. याशिवाय खासगी शाळा विद्यार्थ्यांची गणवेश, पुस्तके विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच घेण्याची सक्ती करीत असतात. यात शाळेचे संचालक, शिक्षक यांचे साटेलोटे दडलेले असल्याचे जगजाहीर आहे. ही सक्ती शाळांनी करू नये यासाठी काँग्रेस आता पुढे सरसावली असून काँग्रेस अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही जागृती केली जाणार आहे. याच वेळी नवनियुक्त सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, भूपेन्द्र गुप्ता, सचिव संतोष शेट्टी, रामचंद्र दळवी, सुधीर पवार, अविनाश रामिष्टे व प्रवक्ता नीला लिमये रासकर यांचा सत्कार केला जाणार आहे.