अध्यक्षपदासाठी अनिल कौशिक, संतोष शेट्टी,  रमाकांत म्हात्रे यांची नावे चर्चेत

दिवसेंदिवस रसातळाला जाणाऱ्या नवी मुंबई काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेस शहरात मोठय़ा प्रमाणात खांदेपालट करणार असून विद्यमान अध्यक्ष दशरथ भगत यांची चार वर्षांची मुदत संपल्यामुळे त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. यात अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य व दक्षिण गुजरातचे संर्पकप्रमुख अनिल कौशिक, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या नावाचा विचार सुरू आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईत आता काँग्रेस नावापुरती शिल्लक आहे. राष्ट्रवादीला काठावर बहुमत मिळाल्याने पालिकेत काँग्रेसच्या दहा नगरसेवकांना महत्त्व आल्याने त्यांचा आधार घेऊन राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे वाशीतील अविनाश लाड यांच्या स्वरूपात काँग्रेसला उपमहापौरपद मिळाले आहे. याच काँग्रेसच्या एक नगरसेविका मीरा पाटील यांनी शिवसेनेला केलेल्या मतदानामुळे पालिकेची स्थायी समिती राष्ट्रवादीच्या हातून गेली. राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी ही खेळी काँग्रेसकडून खेळण्यात आली होती. त्यामुळे पाटील यांच्यावर पक्षाचा अध्यादेश न जुमानल्यामुळे नंतर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. पालिकेत पहिल्या वेळी पक्षाचे २४ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर या पक्षाला उतरती कळा लागून आज ही संख्या १० नगरसेवकांवर येऊन थांबली आहे. १११ नगरसेवकांमध्ये १० नगरसेवक ही अतिशय तुरळक संख्या असल्याने पक्ष वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जाणार आहेत. शहरात पक्षाची भूमिका काळानुरूप बदलली आहे.नामदेव भगत पक्षातील अंर्तगत कलहामुळे शिवसेनेत गेलेले आहेत.

शेट्टी आणि कौशिक यांच्यातच चुरस

अडीच वर्षांनंतर होणाऱ्या पालिका निवडणुकीत पक्षाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी पहिले उपमहापौर अनिल कौशिक यांच्या नावाचा प्राधान्याने विचार केला जात असून सायबर सिटी म्हणून या शहराकडे आत्तापासून लक्ष देण्याच्या सूचना दिल्लीहून देण्यात आलेल्या आहेत. कौशिक यांनी गुजरातमधील भरुच लोकसभा मतदारसंघातील एक नगरपालिका व जिल्हापरिषद काँग्रेसला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नेरुळमधील हॅट्ट्रिक केलेले नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या नावाचा विचार होत आहे; पण शेट्टी यांना पक्षातच विरोध आहे. म्हात्रे यांनी ही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शेट्टी व कौशिक यांच्यात या पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.