समान काम समान वेतनाच्या नावावर शासनाची अधिसूचना असतानाही फसवणूक झाल्याचा आरोप करत पगारवाढीच्या मागणीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी प्रशासनाविरोधात सोमवारपासून चार दिवस रजा आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयाच्या बाहेर सोमवारी विविध आस्थापनातील कंत्राटी कामगारांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणबाजी करत निषेध नोंदवला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये आजमितीस तीन हजारहून अधिक कंत्राटी कर्मचारी सफाई, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, विद्युत विभागामध्ये कार्यरत आहेत. या कामगारांना आजवर कामगार आयुक्त, कामगार मंत्री यांनी शासनाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन दिलेले नाही. प्रशासनाकडून तुटपुंज्या पगारामध्ये या कर्मचाऱ्यांना राबवून घेतले जात आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे. मागील अनेक वर्षांपासून या कामगारांनी आपल्या मागण्या प्रशासनाकडे शांततामय मार्गाने मांडल्या.  मात्र त्याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचारी संतापले आहेत. नवी मुंबईतील समाज समता कामगार संघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ, पीएफ व इतर सोयीसुविधांबाबत सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार सामूहिक रजा आंदोलन हे कर्मचारी करणार आहेत. तर गुरुवारी २७ ऑक्टोबर रोजी पालिका मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण कर्मचारी करणार आहेत. आज सोमवारी महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने केली. महापालिका प्रशासन जोपर्यंत समान काम समान वेतन धोरण जाहीर करत नाही. तोपर्यंत सामूहिक रजा आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

कामगारांच्या आंदोलनाने प्रभाग अस्वच्छ

सफाई, घंटागाडी व विद्युत, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोमवारी सकाळपासूनच कर्मचारी कचरा उचलण्यासाठी न आल्याने संपूर्ण शहरामध्ये पहिल्याच दिवशी कचऱ्याचे ढीग पसरले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा फटका काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार असून त्याचा आरोग्यावरदेखील परिणाम होणार आहे.