माथाडी कामगार मेळाव्यात शरद पवार यांची खंत

राज्य सरकारने बाजार समितीचा नवा कायदा आणल्याने सध्या समिती अस्तित्वात नसल्याने कामगार वर्गासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कंत्राटदारीमुळे कामगार वर्ग संकटात सापडला आहे. या सर्व गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलायच्या होत्या; मात्र काही कारणास्तव मुख्यमंत्री मेळाव्याला आलेले नसल्याची खंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केली.

माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगार मेळावा बाजार समिती आवारात पार पडला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कामगार क्षेत्रातील धोरणे बदलत आहेत. त्यामुळे कामगारांचा आधार संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्यांची काळजी वाटत आहे; मात्र यावर मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करण्यात येईल.  राज्यातील माथाडी कामगारवर्गाच्या समस्या समजून घेण्यासाठी दौरा करण्याची घोषणा करण्यात आली असून याची सुरुवात नाशिकमधून करण्यात येईल, असे ते म्हणाले. या वेळी आमदार नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, गणेश नाईक, भाजपचे प्रसाद लाड आदी उपस्थित होते.