नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या मलप्रक्रिया केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या ४४ कोटी रुपयांच्या प्रस्तावावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आयुक्तांनी हा प्रस्ताव मागे घेतला. हा प्रस्ताव फेरविचारासाठी पुन्हा दाखल करण्यात येईल, असे सभापती नेत्रा शिर्के यांनी सांगितले. या मलप्रक्रिया केंद्रांमध्ये बेलापूर विभागातील नेरुळ सेक्टर ५०, तुभ्रे विभागातील वाशी सेक्टर १८, ऐरोली विभागातील ऐरोली सेक्टर १८ येथील केंद्रांचा समावेश आहे.
अत्याधुनिक सी टेक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रांची देखभाल दुरुस्तीचे नेरूळ, वाशी व ऐरोली येथील सुमारे ४४ कोटी रकमेचे, तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्ती करण्यांचे कंत्राट मंजुरीसाठी स्थायी समितीत सादर करण्यात आले होते. यावर नगरसेवक रवींद्र इथापे, सभागृह नेते जे. डी. सुतार यांनी या प्रस्तावातील दर कमी करण्याची सूचना केली. यावर विरोधी नगरसवेक शिवराम पाटील यांनी हे पैसे वाचवण्याची कल्पना आधी का सुचली नाही, असा प्रश्न विचारला. इथापे यांच्यामुळे पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी पाटील व इथापे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या प्रस्तावातील दर कमी करून तो पुन्हा सादर केला जाईल, असे सांगितले.