आपल्याच मित्राचा खून करून तो अपघात असल्याचा भासवण्याचा कट त्यांनी रचला. मृतदेहाची ओळख पटणार नाही याची खबरदारीही घेतली होती. मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या डेबिट कार्डाच्या पावतीच्या आधारे पोलिसांनी खुन्यांना गाठले..

२५ डिसेंबर २०१६ रोजी खालापूर तालुक्यातील वडविहीर गावाच्या हद्दीत चौक-कर्जत रेल्वे मार्गाजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा चेहरा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवता येत नव्हती. प्रथमदर्शनी हा रेल्वे अपघात असावा, असे वाटत होते. मात्र, मृत व्यक्तीच्या डोक्यासह शरीराच्या अन्य भागावरील जखमांच्या खुणा आणि मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून १५ फूट अंतरापर्यंत आढळलेले रक्ताचे डाग यावरून पोलिसांना यामागे घातपाताचा संशय आला. त्यानुसार त्यांनी भादंवि कलम ३०२ आणि २०१ अन्वये खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
attack on college girl failed after the woman started screaming
शाब्बास! महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांच्या आदेशानुसार खालापूर पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. चेहरा विद्रूप झाल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण जात होते. मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय तपासाला दिशा मिळणार नव्हती. त्यामुळे घटनास्थळी जाऊन पुन्हा एकदा तपास करण्यास पोलीसांनी सुरवात केली. त्यावेळी घटनास्थळाजवळ त्यांना रक्ताने व चिखलाने माखलेली एक जिन्स पँट आढळली. या पँटच्या खिशात डेबिट कार्डाची एक पावती आढळून आली. पोलिसांना महत्त्वाचा धागा सापडला होता.

डेबिट कार्डवरील स्लीपवरील माहितीचा वापर करून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. तेव्हा पुण्यातील जंगली महाराज रोडवरील हॉटेल सुदामा येथे केलेल्या व्यवहाराची ही पावती असल्याचे आढळून आले. हॉटेल तसेच संबंधित बँकेकडे केलेल्या चौकशीत सदर कार्ड पुण्यातील धनकवडी येथील नरेंद्र प्रवीण कुलकर्णी या ३२ वर्षीय तरुणाच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. ही पोलिसांची हाती लागलेली महत्त्वाची माहिती होती. नरेंद्रच्या आईवडिलांच्या रक्ताचे नमुने तसेच डीएनए मृतदेहाशी जुळत होते. त्यावरून मृतदेह नरेंद्रचाच असल्याचे स्पष्ट झाले.

तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. आता नरेंद्रचा खून कोणी व का केला, हे शोधणे आवश्यक होते. पोलिसांनी नरेंद्रच्या कुटुंबीयांकडून जबाब नोंदवून घेतले. त्याच्या मोबाइलमधील कॉल डिटेल्सही तपासण्यात आले. नरेंद्रचे कुणाशी वैर होते का, याची पोलीस चौकशी करत असताना त्याने काही मित्रांकडून धोका असल्याचे आपल्या घरी सांगितल्याचे समजले. पोलिसांनी लागलीच तपासाची दिशा मित्रांच्या बाजूनी फिरवली. या तपासात धनकवडी येथे राहणाऱ्या हेमंत सुरेश विचारे याचे नाव समोर आले. पोलिसांनी हेमंतला ताब्यात घेताच त्याने खुनाची कबुली दिली.

हेमंतनेच इतर पाच आरोपींच्या साहाय्याने २३ डिसेंबर २०१६ ला नरेंद्रचा खून करण्याचा पुण्यात कट रचला होता. मात्र २३ तारखेला नरेंद्र त्यांना सापडला नाही. दुसऱ्या दिवशी नरेंद्रचा पाठलाग करून त्यांनी त्याला पकडले. गाडीत जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. नरेंद्रचे हातपाय बांधून त्याच्या तोंडाला चिकटपट्टी चिटकवून त्याला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून खोपोली परिसरात आणले. खोपोली येथील आलाना कंपनीच्या मागील ओसाड जागेत हेमंत आणि त्याच्या पुण्यातील तीन आणि खोपोलीतील दोन साथीदारांनी मद्यप्राशन केले. नंतर दगडाच्या आणि विटाच्या साह्याने डोके ठेचून नरेंद्रचा खून केला. नरेंद्रच्या अंगावरील कपडे आणि सामान काढून त्याचा मृतदेह डिक्कीत ठेवला. रेल्वे अपघात आहे भासवण्यासाठी मृतदेह चौक-कर्जत रेल्वे मार्गावर आणून टाकला. नरेंद्रचे रक्ताळलेले कपडे व सामान इतरत्र फेकून दिले.

नरेंद्रच्या कुटुंबीयांना संशय येऊ नये, यासाठी हेमंतने त्याचे अपहरण केल्यानंतर नरेंद्रच्याच मोबाइलवरून ‘लुधियानाला कामासाठी जात आहे. वर्षभरानंतर परत येईन,’ असा मेसेज त्याच्या आईवडिलांना पाठवला. त्यानंतर नरेंद्रचे दोन्ही फोन बंद करण्यात आले.

गुन्हा करताना कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली होती. मोबाईल फोन्सचा वापरही टाळला होता. मात्र नरेंद्रच्या जिन्समध्ये चुरगळलेली डेबिट कार्ड पेमेंटची पावती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरली. अज्ञात मृतदेहापासून सुरू झालेला तपास नियोजनबद्ध खुनापर्यंत येऊन पोहचला.

तपासात दाखवलेले कौशल्य, निरनिराळ्या तंत्राचा वापर आणि गुन्ह्याची सखोल चौकशी यामुळे पोलिसांना या निर्घृण खुनाचा उलगडा करता आला. या तपासात खालापूरचे पोलीस उपअधीक्षक व्ही.टी. पांढरपट्टे, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार, साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

हेमंतने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दत्ता लला लोखंडे, रा. पुणे, रोहित राजू गायकवाड, रा. साजगाव, ता. खालापूर, विशाल विवेक भोसले, रा. बिबवेवाडी, पुणे, विशाल गुलचंद कसबे, रा. बिबवेवाडी, पुणे व सचिन रामचंद्र भोसले, रा. खोपोली यांना अटक केली असून या सर्वाना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मित्रानेच मित्राच्या केलेल्या नियोजनबद्ध खुनामागील कारणांचा शोध सध्या पोलीस करत आहेत.