वाशी, बेलापूरच्या आठवडा बाजारांना उत्तम प्रतिसाद

शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आठवडे बाजाराला ग्राहकांची पसंती मिळत आहे. या भाज्यांची विक्री बाजारभावानेच करण्यात येत असली तरीही ताजेपणा आणि गावरान चव यामुळे ग्राहकांनी ही भाजी खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. नवी मुंबईत वाशी व बेलापूरमध्ये आठवडा बाजार भरविले जात असून दोन्ही बाजारांत ग्राहकांची गर्दी होत आहे.

बेलापूरमध्ये एन.आर.आय. कॉम्प्लेक्समध्ये दर रविवारी आणि बुधवारी महानगर गॅस लिमिटेडच्या बाजूच्या मैदानात आणि दर शनिवारी सुनील गावस्कर मैदानात आठवडा बाजार भरतो. सकाळी ८.०० ते दुपारी १.००पर्यंत हे बाजार भरतात. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शेतकरी आठवडा बाजार अभियान सुरू केले आहे. या उपक्रमातून ताजा शेतमाल ग्राहकांना मिळत आहे. या आठवडा बाजारात पुणे, नाशिक, सातारा अशा जिल्ह्यांतून शेतकरी आपला शेतमाल घेऊन येत आहेत.

‘आम्ही रात्री १ वाजता घरातून निघून दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत काम करतो, मात्र दोन पैसे आगाऊ  नफा मिळत असल्याने आम्ही असे कष्ट करण्यास तयार आहोत. आठवडे बाजार सुरू होण्यापूर्वी व्यपाऱ्यांना अडत द्यावी लागे, आता संपूर्ण नफा आम्हाला मिळतो. शिवाय ग्राहकांनाही ताजा शेतमाल मिळतो. त्यामुळे आठवडा बाजारही संकल्पना उपयुक्त ठरत आहे,’ असे मत एका शेतकऱ्याने मांडले.

आठवडे बाजरात चांगला ताजा आणि गावरान शेतमाल मिळतो. त्या निमित्ताने गावच्या भाज्यांची चव चाखायला मिळते. म्हणून मी या बाजारातून भाजीपाला खरेदी करतो.

vashi-market-chart

सूर्यकांत शिंदे, ग्राहक

अन्य बाजारांत आणि आठवडा बाजारात सारख्याच दरात भाज्या मिळतात. आठवडा बाजारात थोडय़ा स्वस्त भाज्या मिळणे अपेक्षित होते. तरी मी येथे फक्त ताज्या पालेभाज्या घेण्यासाठी येते.

रंजना पंडय़ा, ग्राहक

आम्ही खूप परिश्रम करून भाज्या पिकवतो आणि त्या या बाजारात विक्रीसाठी आणतो. यात मिळणाऱ्या नफ्यातून आमचा भाज्या पिकवण्याचा सर्व खर्च निघतो. दोन पैसे मिळतात. त्यासाठीच आम्ही थेट बाजारात येत आहोत.

भाऊ  मुंजाळ, शेतकरी