जेएनपीटीत ७ हजार धोकादायक कंटेनरचा साठा पाच वर्षे पडून

जेएनपीटी बंदरात सीमाशुल्क विभागाने मागील पाच वर्षांत केलेल्या कारवाईत सात हजार कंटेनर ताब्यात घेण्यात आले आहेत. या कंटनेरमध्ये विविध प्रकारची स्फोटकेही असल्याचा अंदाज आहे. कंटेनरची लवकरच विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती जेएनपीटीकडून देण्यात आली आहे. जप्त कंटनेरची एकूण किंमत २५०० कोटींच्या घरात आहे.

जेएनपीटी बंदरातील तस्करी व कंटेनरच्या मालाची चोरी या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. उरीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा देशात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याच वेळी बंदरातून तस्करीच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या संशयित सात हजार कंटेनरचा साठा आहे. यात २८२ कंटेनरमध्ये घातक स्फोटके आहेत, तर ५० कंटेनरमध्ये चीनमधून आयात करण्यात आलेल्या घातक व प्रतिबंधात्मक विभागात मोडणाऱ्या फटाक्यांचाही साठा आहे. तसेच काही कंटनेरमध्ये महागडय़ा मर्सिडीज, रेंजरोवर आदी आलिशान गाडय़ाही आहेत. कंटेनर निकासी एसएसएआय अनिमल्स वॉरंटी, प्लांट वॉरंटी, टाइम अ‍ॅथॉरेटी, ड्रग कंन्ट्रोल या विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या नाहरकत परवानग्या न मिळाल्याने हे कंटेनर येथे ठेवण्यात आलेले आहेत. यांपैकी काही कंटनेर नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात जेएनपीटीचे उपाध्यक्ष नीरज बन्सल यांनी बंदरातील जप्त करण्यात आलेले कंटेनर नष्ट केले जातील, असे सांगितले.