दत्तगुरू अपार्टमेंट, ओनर्स असोसिएशन, वाशी, सेक्टर १५

संकुलातील इमारती, आवार सुंदर असावे, अद्ययावत सोयीसुविधा असाव्यात यासाठी प्रयत्न होताना अनेक ठिकाणी दिसतो, मात्र संकुलातील रहिवाशांचा सर्वागीण विकास व्हावा, म्हणून विशेष मेहनत घेतल्याचे उदाहरण विरळाच! म्हणूनच संकुलातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारे वाशीतील दत्तगुरू अपार्टमेंट हे संकुल इतर सोसायटय़ांपेक्षा वेगळे ठरते.

वाशीत मध्यवर्ती ठिकाणी सेक्टर १५ येथे १९८३ साली दत्तगुरू अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन सोसायटीची स्थापना झाली. संकुलात एक-दोन नव्हे, तर तब्बल ३० इमारती आहेत. त्यांत ४८० कुटुंबे राहतात. वाशी बस आगार, रिक्षा थांबा, बाजार, शाळा, महाविद्यालय अशा सर्व पायाभूत सोयीसुविधा या संकुलापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे रहिवाशांची पायपीट वाचते. या वाचलेल्या वेळेचा उपयोग रहिवासी संकुलाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी करतात.

मुलांना लहानपणापासूनच अभ्यासाची सवय लागावी, लेखन-वाचनाविषयी त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी यासाठी सोसायटीतच अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. संकुलात बरीच लहान मुले असल्यामुळे अंगणवाडीत नेहमीच चिमुकल्यांचा चिवचिवाट सुरू असतो. हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. मुलांना यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. इतका अवधी लोटूनही या सेवेत कोणताही खंड पडलेला नाही. ही अंगणवाडी सध्या सोसायटीच्या कार्यालयात भरविली जात आहे, मात्र भविष्यात अंगणवाडीसाठी वेगळी जागा उपलब्ध करून मुलांना अधिक सोयी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे येथील सदस्यांनी सांगितले.

लहानपणी निर्माण झालेली वाचनाची रुची कायम राहावी यासाठी सोसायटीत १० वर्षांपासून वाचनालय सुरू करण्यात आले आहे. संकुलातील मुलांना विशेषत: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे वाचनालय उपयुक्त ठरत आहे. एमपीएसी परीक्षेसाठीची २५, तर यूपीएसी परीक्षेसाठीची ५० ते  ६० पुस्तके या वाचनालयात उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त विविध प्रकारची सुमारे ४५०० पुस्तके या वाचनालयात आहेत. संकुलात राहणारे सर्वच जण या वाचनालयाचा पुरेपूर लाभ घेतात. विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प तयार करताना येथील पुस्तकांत संदर्भ सापडतात. दरमहा अवघे २० रुपये भरून या वाचनालयाचा लाभ घेता येतो. वाचकांच्या मागणीनुसार दर वर्षी नवीन पुस्तकांची भर घालण्यात येते.

गृहिणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी दोन वर्षांपासून येथे शिवणकलेचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या या वर्गाचे मासिक शुल्क ७०० रुपये आहे. रहिवाशांच्या आरोग्यरक्षणासाठी संकुलाच्या आवारात स्वतंत्र जिमखाना उभारण्यात आला आहे.

संकुलाच्या स्थापनेपासून येथे दत्त मंदिर आहे. त्यामुळे येथे मोठय़ा उत्साहात दत्तजयंती साजरी केली जाते. दत्तजयंतीचा सप्ताह साजरा केला जातो. या सात दिवसांत विविध उपक्रम राबविले जातात. सोसायटीच्या आवारात कमी जागा असल्याने शेजारील महापालिकेच्या शाळेत वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे येथील सदस्यांनी सांगितले. या संकुलाने नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता स्पर्धेत द्वितीय आणि गणेशोत्सव स्पर्धेत उत्कृष्ट सजावटीचा पुरस्कार मिळवला आहे. लवकरच ओला आणि सुका कचरा वेगळा करून खतनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे.

सामाजिक कार्य

वाशी सेक्टर १५ साठीचा एकमेव पोलिओ लसीकरण बूथ दत्तगुरू अपार्टमेंटमध्ये लावण्यात येतो. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक मुलांना घेऊन इथे येतात. महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे बचतगट तयार करण्यात आले आहेत. त्यात या सोसायटीने तब्बल ९५ बचतगट तयार केले आहेत.  दिवाळीमध्ये या बचतगटांतील महिला विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावतात. मागील ८ वर्षांपासून या महिला बचतगटातून अनेक महिलांनी स्वत:चा आर्थिक विकास साधला आहे.